भारतीय महिला संघाने जागतिक हॉकी लीगमधील पराभवाची मालिका गुरुवारी कायम राखली. त्यांना पाचव्या आणि आठव्या क्रमांकांसाठी झालेल्या लढतीत जपानकडून ०-४ असा पराभव स्वीकारावा लागला. जागतिक क्रमवारीत भारतापेक्षा वरचढ असलेल्या जपानने अपेक्षेनुसार या लढतीत वर्चस्व गाजविले. पूर्वार्धात त्यांनी २-० अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्याच मिनिटाला आयुका निशिमुरा हिने संघाचे खाते उघडले तर १८ व्या मिनिटाला शिहो ओत्सुका हिने संघाचा दुसरा गोल केला. उत्तरार्ध सुरू नाही तोच ओत्सुकाने स्वत:चा दुसरा व संघाचा तिसरा गोल नोंदविला. त्यांचा चौथा गोल युरी नगाई हिने केला. या सामन्यातील पराभवामुळे स्पर्धेत पाचवे किंवा सहावे स्थान मिळविण्याची संधी भारताने गमावली.