शेवटची तीन मिनिटे बाकी असताना थिलो स्ट्रॅल्कोवस्की याने केलेल्या गोलामुळेच जर्मनीने जागतिक हॉकी लीगमध्ये यजमान भारताला ३-३ असे बरोबरीत रोखले आणि आपले आव्हान कायम राखले.
मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने तीन वेळा आघाडी घेतली. मात्र प्रत्येक वेळी जर्मनीच्या खेळाडूंनी ही पिछाडी भरून काढडण्यात यश मिळविले. पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारताने हा सामना बरोबरीत रोखून काही अंशी सुधारणा दाखविली. भारताकडून व्ही. आर. रघुनाथ (१९व्या मिनिटाला), रुपिंदरपाल सिंग (३३व्या मिनिटाला) व धरमवीर सिंग (५१व्या मिनिटाला) यांनी गोल केले. जर्मनीकडून कोर्न ऑलिव्हर (२४व्या मिनिटाला), पीट अरनॉल्ड (४२व्या मिनिटाला) व थिलो स्ट्रॅल्कोवस्की (६७व्या मिनिटाला) यांनी गोल नोंदविले.
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या या लढतीत दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ पाहायला मिळाला. पहिल्या दोन सामन्यांच्या तुलनेत भारतीय खेळाडूंनी या लढतीत चांगला खेळ केला. सुरुवातीपासूनच त्यांनी आक्रमक धोरण स्वीकारले होते. त्यांना गोल करण्याच्या काही संधी मिळाल्या. मात्र त्याचा अपेक्षेइतका फायदा त्यांना घेता आला नाही. १९व्या मिनिटाला भारताच्या रघुनाथने मारलेला फटका जर्मनीच्या बचावरक्षकांच्या स्टीकला लागून गोलात गेला. ही आघाडी फार वेळ टिकली नाही. २४ व्या मिनिटाला जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत ऑलिव्हरने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. पूर्वार्ध संपण्यापूर्वी भारताला आणखी एक हुकमी संधी मिळाली. मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा पुरेपूर फायदा घेत रुपिंदरपालने गोल केला.
उत्तरार्धात जर्मनीने सुरुवातीपासून जोरदार चाली केल्या. सामन्याच्या ४२व्या मिनिटाला अरनॉल्डने मारलेला फटका भारताच्या रघुनाथच्या स्टीकला लागून गोलमध्ये गेला. त्यामुळे पंचांनी जर्मनीला गोल बहाल केला. भारतीय खेळाडूंनी त्याविरुद्ध तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. मात्र त्या पंचांनीही गोल मान्य केला. ५१व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत रघुनाथने गोलाच्या दिशेने चेंडू मारला. जर्मनीच्या बचावरक्षकांनी हा चेंडू परतविला, तथापि भारताच्या धरमवीर सिंगने शिताफीने चेंडू गोलजाळ्यात तटविला आणि संघास ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी भारत टिकविणार, असे वाटत असतानाच ६७व्या मिनिटाला अरनॉल्डच्या पासवर स्ट्रॅल्कोवस्कीने गोल केला आणि ३-३ अशी बरोबरी साधली. या बरोबरीतच सामना संपला.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jan 2014 रोजी प्रकाशित
जागतिक हॉकी लीग स्पर्धा : भारताची जर्मनीशी बरोबरी
शेवटची तीन मिनिटे बाकी असताना थिलो स्ट्रॅल्कोवस्की याने केलेल्या गोलामुळेच जर्मनीने जागतिक हॉकी लीगमध्ये यजमान भारताला ३-३ असे बरोबरीत रोखले आणि आपले आव्हान कायम राखले.

First published on: 14-01-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hockey world league spirited india hold germany to a draw