इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या टोपणनावाने प्रसिद्ध झालेल्या बॅझबॉल तंत्राला प्रत्युत्तर देत भारतीय संघाने रांची कसोटी जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. मॅक्युलम यांनी प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यापासून इंग्लंडचा हा पहिलाच मालिका पराभव आहे. रांची कसोटीत अनेक चढउतार पाहायला मिळाले. इंग्लंडने सातत्याने भारताला अडचणीत आणलं पण भारतीय संघाने चिवटपणे टक्कर देत विजय मिळवला. भारताने ही कसोटी नेमकी कुठे जिंकली हे ५ मुद्यांद्वारे समजून घेऊया.

जो रूट आणि बॅझबॉल बॅकफूटवर
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये १२००० धावा आणि ३०हून अधिक शतकं आहेत. भारताविरुद्ध आणि भारतात रूटची कामगिरी दमदार होते. या दौऱ्यातही रूटकडून इंग्लंड संघव्यवस्थापनाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण मॅक्युलम यांनी बॅझबॉल पद्धत राबवल्यापासून रूटने आपल्या खेळात बदल केले. पारंपरिक पद्धतीने खेळत, एकेरी दुहेरी धावा तटवून स्थिरावल्यानंतर चौकार लगावणं हा रुटचा खाक्या. पण या मालिकेत रुटने रिव्हर्स स्वीप, रिव्हर्स स्वीच, रॅम्प शॉट असे अपारंपरिक फटके खेळून धावा करण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा संघ सुस्थितीत असताना रूट, जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर रॅम्पचा विचित्र फटका खेळून बाद झाला. रूट बाद झाला आणि इंग्लंडची लय बिघडली. पराभवाचं खापर रूटवर निघालं. माजी खेळाडूंनीही बेजबाबदार फटक्यासाठी, खेळासाठी रूटवर टीका केली. मालिकेत आव्हान जिवंत राखण्यासाठी रांची कसोटी जिंकणं इंग्लंडला आवश्यक होतं. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या इंग्लंडची घसरगुंडी उडाली. रूटने बॅझबॉल तंत्राला मुरड घातली आणि नेहमीच्या शैलीत खेळ केला. इंग्लंडचे बाकी फलंदाज बॅझबॉल तंत्राने खेळत होते. आक्रमक सुरुवातीनंतर त्यांच्या विकेट्स पडत गेल्या. रूटने मात्र एकखांबी नांगर टाकून शतकी खेळी साकारली. रूटला नेहमीच्या शैलीत परतावं लागलं तर बाकी खेळाडू बॅझबॉल धोरणाने खेळत असल्याने पटापट बाद होत गेले. भारतीय संघाने रांची कसोटीत बॅझबॉलला बॅकफूटवर ढकललं. नेहमीच अति आक्रमक पद्धतीने खेळून ध्येय साधत नाही हे भारतीय संघाने दाखवून दिलं.

आश्वासक ध्रुव
या मालिकेसाठी निवडसमिती आणि संघव्यवस्थापनाने विकेटकीपर फलंदाज म्हणून के.एस.भरतला प्राधान्य दिलं. पण भरतला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. राजकोट कसोटीत ध्रुव जुरेलला भारताची कॅप देण्यात आली. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या ध्रुवचा डोमेस्टिक क्रिकेटमधला अनुभव मर्यादित होता. पण निवडसमिती आणि संघव्यवस्थापनाने ध्रुवच्या गुणकौशल्यांवर विश्वास ठेवला. राजकोट कसोटीत ध्रुवने उत्तम विकेटकीपिंग केलं होतं. रांची कसोटीत एक पाऊल पुढे टाकत ध्रुवने दडपणाच्या स्थितीत झुंजार खेळी केली. इंग्लंडच्या ३५३ धावांसमोर खेळताना भारताची अवस्था १७७/७ अशी झाली होती. अनुभवी जेम्स अँडरसनच्या बरोबरीने शोएब बशीर, टॉम हार्टले, जो रूट हे सगळेच टिच्चून मारा करत होते. ध्रुवने कोशात न जाता संयमी खेळी केली. कोणताही आततायी फटका खेळला नाही. त्याने कुलदीपच्या बरोबरीने ८व्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. यानंतर आकाशदीपच्या साथीने ९व्या विकेटसाठी ४० धावा जोडल्या. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर ध्रुवने भात्यातले फटकेही बाहेर काढले. शतकाकडे वाटचाल करत असतानाच टॉम हार्टलेच्या अफलातून चेंडूवर तो बाद झाला. त्याने ९० धावा केल्या. त्याचं शतक झालं नाही पण त्याने भारतीय संघाला संकटातून बाहेर काढलं. दुसऱ्या डावातही अचानक विकेट्सची पडझड झालेली असताना ध्रुव खेळायला उतरला. नाबाद ३९ धावा करताना त्याने शुबमन गिलसह महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. इतक्या दडपणात खेळायचा अनुभव नसतानाही ध्रुवने अतिशय परिपक्वतेने फलंदाजी आणि यष्टीरक्षण केलं. लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी ध्रुवच्या खेळात धोनीचे गुण दिसत असल्याचं म्हणत त्याला शाबासकी दिली. दोन्ही डावात झुंजार खेळीसाठी ध्रुवला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

कुलदीपची फिरकी आणि बॅटिंगही
चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने पहिल्या डावात केवळ १२ षटकं गोलंदाजी केली. पण रांची कसोटीत त्याचं योगदान उल्लेखनीय होतं. पहिल्या डावात घसरगुंडी झालेली असताना कुलदीपने १३१ चेंडूत २८ धावांची संयमी खेळी केली. ध्रुव जुरेलला पुरेपूर साथ देत त्याने विकेट्सची पडझड थांबवली. कुलदीपने अतिशय आत्मविश्वासाने इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना केला. या मालिकेत कुलदीपने फलंदाज म्हणून दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. त्याने त्याच्या फलंदाजीवर मेहनत घेतल्याचं स्पष्ट दिसत आहे. केवळ टूकटूक न खेळता कुलदीपने धावाही जमवल्या आहेत. त्याच्यामुळे भारताची फलंदाजी आठव्या क्रमांकापर्यंत गेली आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात कुलदीपने ४ विकेट्स पटकावत खिंडार पाडलं. त्याने उत्तम फॉर्मात असलेल्या झॅक क्राऊलेला सापळा रचून माघारी धाडलं. एकहाती सामना फिरवू शकणाऱ्या बेन स्टोक्सला त्रिफळाचीत केलं. टॉम हार्टले आणि ऑली रॉबिन्सन यांना त्याने स्थिरावू दिलं नाही. कुलदीपने १५ षटकात अवघ्या २२ धावा देत ४ विकेट्स पटकावल्या.

अश्विनचे पंचक
इंग्लंडचा बेन डकेट मालिकेत उत्तम खेळत आहे. डकेट सलामीला येतो, त्यावेळी रवीचंद्रन अश्विनला गोलंदाजी का देत नाहीत असं सवाल चाहते करत होते. यादरम्यान डकेटने खणखणीत शतकही साजरं केलं. रांची कसोटीत मात्र चाहत्यांचा विश्वास अश्विनने सार्थ ठरवला. पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी अश्विनच्या गोलंदाजीवर धावा कुटल्या होत्या पण दुसऱ्या डावात मात्र अश्विनने ५ विकेट्स घेत सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने फिरवलं. पहिल्या डावात ३५३ धावा करणाऱ्या इंग्लंडला दुसऱ्या डावात मात्र १४५ धावाच करता आल्या. अश्विनने ३५व्यांदा डावात पाच विकेट्स घेण्याची करामत केली.

रोहितने रचला पाया, गिल-जुरेलच्या भागीदारीने केलं शिक्कामोर्तब
भारतात कसोटीच्या चौथ्या डावात खेळणं आव्हानात्मक मानलं जातं. भारतीय संघाला १९२ धावांचं लक्ष्य मिळालं. जवळपास दोनशे धावा करणं अवघडच होतं. पण कर्णधार रोहित शर्माने तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात इरादे स्पष्ट केले. रोहितने आक्रमक पवित्रा स्वीकारला. चौथ्या दिवशीही त्याने तसाच खेळ केला. रोहितने ५ चौकार आणि एका षटकारासह ५५ धावांची खेळी केली आणि विजयाचा पाया रचला. रोहित-यशस्वी जैस्वाल जोडी फुटल्यानंतर भारताने झटपट विकेट्स गमावल्या. पण शुबमन गिल आणि ध्रुव जुरेल यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद ७२ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

वैयक्तिक कारणांमुळे रनमशीन विराट कोहली या मालिकेत नाहीये. दुखापतीमुळे श्रेयस अय्यर आणि के.एल राहुल या कसोटीत नव्हते. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांचा या मालिकेसाठी निवडसमितीने विचार केला नाही. वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार करुन भारताने रांची कसोटीत जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने युवा संघाची मोट बांधत तुल्यबळ संघाविरुद्ध दिमाखदार विजय साकारला आहे.