India vs South Africa Match Tickets: आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभूत करून, तर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून या स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना रविवारी २ नोव्हेंबरला नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरूवात होईल. दरम्यान हा सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याचं तिकीट किती रूपयांना असेल आणि तिकीट कसं बुक करायचं? जाणून घ्या.

या स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. हा सामना पाहण्यासाठी ३४,६०० हून अधिक क्रिकेट चाहते उपस्थित होते. या स्पर्धेतील अंतिम सामना पाहण्याचं तिकीट १५० रुपयांपासून उपलब्ध आहे. तर आणखी एक तिकीट २५० रूपये आहे. त्यामुळे एक पिझ्झा खरेदी करता येईल, त्यापेक्षाही कमी किमतीत तुम्ही भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्याचं तिकीट खरेदी करून वर्ल्डकप फायनलचा अनुभव घेऊ शकता.

तिकीट बुक कसं करायचं?

भारता आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना पाहण्याचं तिकीट तुम्ही बुक माय शो या अॅपवरून बुक करू शकता. यासह बुक माय शोच्या वेबसाईटवरूनही बुक करू शकता. अॅप ओपन केल्यानंतर आयसीसी महिला वर्ल्डकप, डी. वाय.पाटील किंवा भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सर्च करा. त्यानंतर तुम्हाला तिकीट खरेदी करण्याचा पर्याय दिसेल.

दोन्ही संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत भिडणार

महिलांच्या वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. पण भारतीय संघाने आता ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर करून अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने दमदार फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लंडला दणका देत अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. दोन्ही संघ वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांनी एकदाही वनडे वर्ल्डकप स्पर्धेची ट्रॉफी उंचावलेली नाही. त्यामुळे जो संघ जिंकेल, तो पहिल्यांदाच ट्रॉफी उंचावणार आहे. त्यामुळे महिला क्रिकेटला नवा वर्ल्ड चॅम्पियन संघ मिळणार हे निश्चित आहे. आता कोणता संघ बाजी मारणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.