बतुमी (जॉर्जिया) : अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी आणि युवा ‘आंतरराष्ट्रीय मास्टर’ दिव्या देशमुखने काळ्या मोहऱ्यांनी खेळताना भक्कम बचावाचे दर्शन घडवत महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपापल्या लढतींचे पहिले डाव बरोबरीत सोडवले. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्याच्या दृष्टीने या दोघीही उत्तम स्थितीत आहेत.
भारताच्या दोनही खेळाडूंसमोर चिनी प्रतिस्पर्ध्यांचेच आव्हान आहे. यापैकी माजी ‘कँडिडेट्स’ विजेत्या ली टिंगजीला हम्पीने बरोबरीत रोखले. अन्य उपांत्य लढतीत माजी जगज्जेत्या टॅन झोंगयीने विजयासाठी प्रयत्न केले. मात्र तिला दिव्याचा बचाव भेदता आला नाही. याआधीच्या लढतींत निडरपणे खेळताना आपल्या आक्रमक चालींनी प्रतिस्पर्ध्यांना निष्प्रभ करणाऱ्या १९ वर्षीय दिव्याने या वेळी आपल्या खेळाची दुसरी बाजूही दाखवली. काळ्या मोहऱ्यांनी खेळत असल्याने तिने बचावावर लक्ष केंद्रित केले. याचा तिला फायदा मिळाला. आता हम्पी आणि दिव्या यांना आज, बुधवारी पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याची संधी लाभेल. पारंपरिक प्रकारातील दुसरा डावही बरोबरीत सुटल्यास जलद ‘टायब्रेकर’चा अवलंब केला जाईल.
पहिल्या डावात झोंगयीने सुरुवातीला वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र दिव्याने तिला रोखले. त्यामुळे लढत ‘क्वीन्स गँबिट’च्या दिशेने गेली. दिव्याने अगदी सहजपणे प्याद्यांची आदलाबदल केली. झोंगयीनेही आक्रमकता दाखवली. मात्र अखेरीस हत्तीचा मोहरा आणि तीन प्यादीच शिल्लक राहिल्याने दोघींना लढत बरोबरीत सोडविण्यावाचून पर्याय नव्हता. अन्य लढतीत, भारताची अव्वल महिला बुद्धिबळपटू हम्पीने अभावानेच वापरली जाणार चाल रचून टिंगजीला आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे सुरुवातीच्या चालींमध्येच टिंगजी गोंधळलेली दिसली. डावाच्या मध्यात या दोघींनी वजिराची आदलाबदल केली. मात्र दोन्ही बाजूचे उंट पटावर कायम असल्याने लढत बरोबरीत सुटणार हे निश्चित झाले.