‘‘जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाडू मेहनत करतो. पुरुष असो वा महिला, एकेरी किंवा दुहेरी-प्रत्येक खेळाडूला जिंकायचे असते. सगळ्यांच्या प्रयत्नांमध्ये समानता असते मात्र जेतेपद पटकावल्यानंतर मिळणाऱ्या बक्षीस रकमेत प्रचंड तफावत आढळते. परंपरावादी भेदभावाच्या वागणुकीमुळेच राष्ट्रीय स्वरूपाच्या स्पर्धामध्ये खेळायचे टाळते,’’ असे उद्वेगजनक मत बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टाने व्यक्त केले. प्लेविन लॉटरीच्या विजेत्यांच्या सत्कारप्रसंगी ज्वाला बोलत होती.
ती पुढे म्हणाली की, ‘‘चार-पाच वर्षांपूर्वी मुंबईत एका स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला मला आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी समान बक्षीस रकमेबाबत मी आग्रही भूमिका मांडली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर यासंदर्भात जागरूकता वाढली आहे. टेनिसमध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये समान बक्षीस रकमेसाठी चळवळ रुजली आणि त्याला यशही मिळाले.’’
काही दिवसांपूर्वी स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकलने असमान बक्षीस रकमेच्या कारणास्तव राष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेतली होती. दीपिकाच्या भूमिकेला माझा पूर्ण पाठिंबा आहे. अन्यायकारी विषम बक्षीस रकमेच्या प्रथेचे उच्चाटन व्हावे यासाठीच्या चळवळीचा भाग व्हायला आवडेल, असेही ज्वालाने स्पष्ट केले.
बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष किंवा महिला एकेरीच्या विजेत्या खेळाडूला समजा एक लाखाच्या बक्षीस रकमेने गौरवण्यात येते. त्याचवेळी दुहेरीचे जेतेपद पटकावणाऱ्यांच्या नशिबी ३०,००० रुपये येतात. ही रक्कम जोडीदारांमध्ये विभागली जाते. खेळाडूंसाठी बक्षीस रक्कम हा मोठा आधार असतो. कारण कारकीर्द ऐन भरात असताना तो स्थायी स्वरूपाची नोकरी किंवा व्यवसाय करू शकत नाही. अशावेळी किरकोळ स्वरूपाची बक्षीस रक्कम मिळणार असेल तर त्याने सराव, स्पर्धासाठी प्रवास, प्रशिक्षण, आहारतज्ज्ञ, ट्रेनर या सगळ्याचा खर्च कसा भागवायचा, असा सवाल ज्वालाने केला.
दुहेरीच्या प्रशिक्षकाला स्वायत्तता मिळावी
मलेशियाचे किम तान हर यांची दुहेरीचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होणे सकारात्मक गोष्ट आहे. मात्र दुहेरीचे प्रशिक्षण, सराव, स्पर्धामध्ये सहभाग यासंदर्भात त्यांना स्वायत्तता मिळायला हवी. कोणत्याही स्तरातून त्यांच्या कामात हस्तक्षेप व्हायला नको. राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि ज्वाला यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. मात्र त्यांचे नाव न घेता ज्वालाने सूचक भाष्य केले.
अधिकृत कल्पना नाही
केंद्र सरकारच्या लक्ष्य ऑलिम्पिक योजनेत माझ्या आणि अश्विनी पोनप्पाच्या नावाचा समावेश केल्याचे मला प्रसारमाध्यमांद्वारे कळले. हा निर्णय प्रेरणादायी आहे, मात्र योजनेत समावेश झाल्याचे अधिकृतरीत्या कळवण्यात आलेले नाही, असे ज्वालाने स्पष्ट केले.