सध्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेमुळे भारतीय चाहत्यांचे लक्ष टीम इंडियाच्या मैदानावरील कामगिरीकडे लागले असतानाच मैदानाबाहेरदेखील अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. यामध्ये भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक कोण असेल, या विषयाची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सध्याचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना मुदतवाढ न दिल्याने नव्या प्रशिक्षकासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्न याने एक विधान करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत नसूनही शेन वॉर्न अचानकपणे चर्चेत आला आहे. मुळात बीसीसीआयकडून प्रशिक्षकपदासाठी शेन वॉर्नचा अजिबात विचार करण्यात आलेला नाही. मात्र, वॉर्नने परस्परच माझे मानधन बीसीसीआयला परवडणार नाही, अशी फुशारकी मारली आहे.
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठीच्या समालोचकांच्या चमतू असल्यामुळे सध्या शेन वॉर्न इंग्लंडमध्ये आहे. यावेळी ‘मिड-डे’शी बोलताना वॉर्नने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासंदर्भात भाष्य केले. मी खूपच महागडा आहे. त्यामुळे मी बीसीसीआयला परवडणार नाही, असे मला वाटते. विराट कोहली आणि माझे चांगल्याप्रकारे जमू शकते. मात्र, अगोदरच म्हटल्याप्रमाणे, मी खूपच महागडा असल्यामुळे त्यांना परवडणार नाही, असे वॉर्नने सांगितले. त्यामुळे आता वॉर्नच्या या विधानावर बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट चाहते कशाप्रकारे व्यक्त होतात, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी तीव्र स्पर्धा
काही दिवसांपूर्वीच भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या स्पर्धेत उडी घेतली होती. सेहवागबरोबरच ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू टॉम मूडी आणि इंग्लंडचे रिचर्ड पायबस, माजी वेगवान गोलंदाज डोड्डा गणेश आणि भारतीय अ संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनीदेखील प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे ही स्पर्धा तीव्र झाली आहे. या सगळ्यांच्या तुलनेत शेन वॉर्नला प्रशिक्षकपदाचा फारसा अनुभव नाही. मात्र, २००८ मध्ये वॉर्नने आयपीएलच्या पहिल्याच मोसमात राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षकपद भुषविले होते. त्यावेळी राजस्थान रॉयल्सने आयपीएलचे विजेतेपदही मिळवले होते. त्यानंतर वॉर्न २०१० पर्यंत संघाबरोबर होता. त्यामुळे वॉर्न भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उतरला असता तर तो नक्कीच या पदासाठीचा मोठा दावेदार ठरला असता. मात्र, वॉर्नने केलेले विधान पाहता तुर्तास तरी तो टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी उत्सुक नसल्याचे दिसत आहे.