आयपीएल चषकावर पाचवेळा नाव कोरण्याचा मान मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. आयपीएलमध्ये सर्वोत्तम संघ म्हणून मुंबईची गणना होते. प्रत्येक सिझनमध्ये मुंबई इंडियन्स आपल्या कामगिरीची मोहोर उमटवली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये प्रत्येक वेळी विजयाचा दावेदार म्हणून संघाकडे पाहिलं जातं. या संघांचं रोहित शर्मा नेतृत्व करत आहे. तसेच मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना हार्दिक पंड्याने आपल्या चांगल्या कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. हार्दिक पंड्याचा मुंबई संघाशी संबंध २०१५ पासून आहे. हार्दिक पंड्याला १० लाख रुपये मानधन देत संघात सहभागी केलं होतं.

मुंबई इंडियन्स संघाकडून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करताना पहिल्याच वर्षी म्हणजेच २०१५ आयपीएल चषक जिंकला. त्यानंतर २०१७, २०१९, २०२० या वर्षात खेळल्या गेलेल्या स्पर्धेत मुंबईकडून खेळताना हार्दिक पंड्याने चांगली कामगिरी केली. मुंबई इंडियन्सकडून खेळताना कसा अनुभव होता?, हा प्रश्न विचारल्यानंतर हार्दिक पंड्याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना त्याने आपला अनुभव शेअर केला.

“मुंबई इंडियन्स माझ्या पाठिशी कायमच राहिली आहे. जेव्हा माझे वडील जानेवारी २०२१ रोजी वारले. त्यानंतर कृणाल आणि मला मुकेश सर आणि नीता मॅमचं पत्र मिळालं. त्यांनी पत्रातून शोक व्यक्त केला होता. ते पत्र आमच्यासाठी खूप भावनिक होते. ते वाचल्यानंतर मी ढसाढसा रडू लागलो”, असं हार्दिक पंड्याने सांगितलं. “आकाश माझा चांगला मित्र आहे. मला कधीच वाटलं नाही की, तो आमचा मालक आहे. तो नेहमीच प्रेरणा देतो आणि पाठिशी उभा असायचा. मी कधीच स्वत:ला महत्त्व देत नाही. मला इतर लोकं चांगलं ओळखतात. कारण मुंबई इंडियन्सने मला ओळख दिली. माझ्यातला क्रिकेटपटू ओळखून विश्वास ठेवला. त्यामुळेच मला फायदा झाला”, असंही हार्दिकने पुढे सांगितलं.