‘ओव्हर रेटच्या बाबतीत भारतीय संघ संथ असला तरी त्यांना शिक्षा करू नका असं सांगण्यात आलं होतं’, असा धक्कादायक खुलासा माजी मॅचरेफरी ख्रिस ब्रॉड यांनी केला आहे. ‘मी आदेशाचं पालन केलं मात्र भारतीय संघाने खरंच संथ गतीने गोलंदाजी केली होती. पुढच्या सामन्यातही वारंवार कल्पना देऊनही भारतीय संघ ओव्हर रेटच्या बाबतीत मागेच होता’, असं ब्रॉड यांनी सांगितलं.
२००३ ते २०२४ अशा प्रदीर्घ कालाधीत ब्रॉड यांनी १२३ टेस्ट, ३६१ वनडे आणि १३८ टी२० सामन्यात ब्रॉड यांनी मॅचरेफरी म्हणून काम पाहिलं. ब्रॉड यांची त्यापुढेही काम करायची इच्छा होती मात्र आयसीसीने त्यांच्या कराराचं नूतनीकरण केलं नाही.
टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत ब्रॉड यांनी सांगितलं की, ‘भारतीय संघ निर्धारित वेळेसंदर्भात त्या सामन्यात तीन ते चार ओव्हर मागे होता. यामुळे त्यांना दंड होणं साहजिक होतं. त्याचवेळी मला कॉल आला. भारतीय संघाबाबत फार कठोर वागू नका. लगेच घाईने कारवाई करण्याची गरज नाही. मी त्यानुसार थांबलो. मात्र पुढच्याही सामन्यात भारताला ओव्हर रेटचं गणित पाळता आलं नाही. भारताचा कर्णधार सौरव गांगुलीला ओव्हर रेटसंदर्भात सांगितलं पण तो ऐकत नसे. मग मी फोन करून विचारलं, काय करायचं? तेव्हा संघाला नको, त्याला वैयक्तिक शिक्षा करा असं सांगण्यात आलं. असं सगळं राजकारण आहे आणि हे पहिल्यापासून आहे. आता बरेचसे जण राजकीयदृष्ट्या संलग्न असतात. काहीजण अंगाला तोशिश लागू नये असं वागतात’.
भारतीय संघाचा उल्लेख असलेले ते सामने नेमके कुठले याबाबत ब्रॉड यांनी तपशीलात सांगितलं नाही.
राजकीयदृष्ट्या सक्रिय वातावरणात राहूनही मी चांगलं काम केलं असं सांगत ब्रॉड यांनी स्वत:ची पाठू थोपटून घेतली. ‘काही देशांमध्ये परिस्थिती नीट नसल्यामुळे जाणार नाही असंही ब्रॉड यांनी सांगितलं. मला मॅचरेफरी म्हणून काम करत राहायचं होतं. २० वर्ष मॅचरेफरी म्हणून काम करताना मी अनेक अवघड प्रसंग पाहिले. अनेक वार झेलले. राजकीय आणि शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर कसोटीचे क्षण अनुभवले. २० वर्ष मॅचरेफरी ही अवघड जबाबदारी पार पाडणे सोपं नाही’.
‘काही देशात मी गेलो नाही. मी सारासार विचार करुन निर्णय घेणारा माणूस आहे. चांगलं काय, वाईट काय याचा साकल्याने विचार करून मी भूमिका घेतो. राजकीयदृष्ट्या संवेदनशील वातावरणात राहून काम करणं अवघड आहे. मी २० वर्ष सातत्याने हे काम केलं याचं समाधान आहे’, असं ब्रॉड यांनी सांगितलं.
२००९ मध्ये श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असताना दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यातून खेळाडू आणि मॅचरेफरी-अंपायर्स थोडक्यात बचावले. त्या घटनेसंदर्भात विचारलं असता ब्रॉड म्हणाले, ‘आजही एखादा मोठा आवाज झाला तर काळजात धस्स होतं. तो दिवस आठवतो. मी जिवंत राहिलो नशीब बलवत्तर म्हणूनच. सामन्याशी निगडीत सगळ्यांची सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य असायला हवं यावर शिक्कामोर्तब झालं. दहशतवादी हल्ल्याने माझा दृष्टिकोनच बदलून गेला. मॅचरेफरी म्हणून मी काय करायला हवं, काय नको याचाही मी नव्याने विचार केला’.
‘व्हिन्स व्हॅन डर बिल हे माझे वरिष्ठ होते. ते तेव्हा आयसीसी अंपायर्स मॅनेजर होते. त्यांना क्रिकेटची पार्श्वभूमी होती. त्यामुळे ते समजून घ्यायचे. ते बाजूला झाल्यावर व्यवस्थापन एकदमच कमकुवत झालं. भारताला आयसीसीच्या कमाईतला सर्वाधिक वाटा मिळू लागला. आयसीसीमध्ये भारताची सद्दी निर्माण झाली. मी आता कार्यरत नाहीये हे चांगलंच आहे कारण आता वातावरण राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे’, असं ब्रॉड म्हणाले.
