चेन्नई सुपर किंग्स संघातील गुरुनाथ मयप्पनच्या भूमिकेबाबत व्यक्त केलेले माझे मत चुकल्याचे ऑस्ट्रेलियाचा फलंदाज माइक हसीने म्हटले आहे. गुरुनाथ मयप्पनकडेच चेन्नई संघाची सर्व सूत्रे असल्याचे माइक हसीने आपले आत्मचरित्र ‘अंडरनिथ द सदर्न क्रॉस’ या पुस्तकात म्हटले होते.
 आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात मयप्पन याच्यावर खटला सुरू आहे. त्या पाश्र्वभूमीवर हसीच्या लिखाणाने खळबळ उडवून दिली होती. मात्र आपले मत चुकीचे असल्याचे सांगत हसीने माघारी जाणे पसंत केले आहे. संघमालक एन. श्रीनिवासन यांची मी माफीही मागितल्याचे हसीने सांगितले.
चेन्नई संघाचे मालक आणि बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी संघाची सूत्रे जावई गुरुनाथ मयप्पनकडे सोपवल्याचे हसीने म्हटले होते. मात्र मयप्पनच्या संघातील भूमिकेबाबत मला चित्र स्पष्ट झालेले नाही आणि त्याविषयी व्यक्त केलेले मत चुकीचे असल्याचे हसीने म्हटले आहे.
‘‘मयप्पन संघासोबत असायचा. तत्कालीन प्रशिक्षक केपलर वेसेल्स यांच्याशी त्याचे बोलणे व्हायचे. हॉटेलमध्ये, सरावाच्या ठिकाणी तो उपस्थित असे. त्याचे अधिकृत पद मला माहिती नव्हते. संघाच्या महत्त्वपूर्ण व्यक्तींपैकी तो एक होता. मात्र याविषयी संघमालक श्रीनिवासन यांना मी काही विचारणे उचित ठरले नसते. संघ कोण चालवतो, याविषयी माझ्यापेक्षा त्यांना माहिती असणे साहजिक होते, त्यामुळे मीच लिहिताना चुकलो,’’ असे हसीने सांगितले.