ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांची मागणी
बिग बॅश लीगदरम्यान महिला पत्रकाराशी असभ्य वर्तन करणारा वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलवर जगभरातून बंदी घालण्यात यावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियाचे महान कर्णधार इयान चॅपेल यांनी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव चॅपेल यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिला आहे. या प्रस्तावामध्ये गेलला त्याच्या असभ्य वर्तणुकीबाबत कदापि क्षमा करू नये, असे चॅपेल यांनी लिहिले आहे.
‘‘असभ्य वर्तणुकीबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गेलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यावर जगभरातून बंदी घालण्यात यावी, असे ऑस्ट्रेलियाने आयसीसीलाही सांगायला हवे. त्याचबरोबर प्रत्येक देशाच्या संघटनेलाही ही गोष्ट सांगायला हवी. नाही तर अशा गोष्टींना कसा आळा घालता येईल?’’ असे चॅपेल म्हणाले.
‘बिग बॅश’च्या सामन्यादरम्यान सोमवारी गेलची मुलाखत घेण्यासाठी मेल मॅकलॉघिन ही महिला पत्रकार गेली होती. तिला गेल म्हणाला, ‘‘तुझ्यासारखे डोळे मी प्रथमच पाहात आहे. हा सामना आम्ही जिंकू, अशी मला आशा आहे. त्यामुळे हा सामना जिंकल्यावर आपण मद्यपान करायला जाऊ. लाजू नकोस.’’ यानंतर गेलवर चहुबाजूंनी टीका झाली होती. त्यानंतर त्याला दहा हजार डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला. आता त्याच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलिया बंदी घालण्याच्या तयारीत आहे.
‘‘जर गेलकडून असभ्य वर्तन पहिल्यांदा घडले असेल तर त्याला दंड ठोठावून ताकीद देणे उचित ठरेल, पण गेलने बऱ्याच वेळा क्रिकेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बऱ्याच महिलांबरोबर असभ्य वर्तन केले आहे. त्यामुळे गेलवर जगभरातून बंदी घालण्यात यावी,’’ असे चॅपेल म्हणाले.
गेलकडून हेच वर्तन अपेक्षित -वॉटसन
मेलबर्न : ख्रिस गेलला जे जवळून ओळखतात त्यांना तो कसा आहे, हे चांगलेच माहिती आहे. त्यामुळे त्याच्याकडून हेच अपेक्षित आहे, असे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शेन वॉटसनने व्यक्त केले. ‘‘मी बरीच वर्षे गेलच्याविरुद्ध खेळलो आहे. जेव्हापासून मी त्याला पाहात आहे, तेव्हापासून त्याच्याकडून याच वर्तणुकीची अपेक्षा केली जाऊ शकते, पण या वेळी मात्र तो संकटात सापडू शकतो,’’ असे तो म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2016 रोजी प्रकाशित
गेलवर जगभरातून बंदी घाला
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांची मागणी

First published on: 09-01-2016 at 04:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ian chappell calls for worldwide ban on chris gayle