आयसीसीने सोमवारी महिला टी-२० टीम ऑफ द इयर २०२२ ची घोषणा केली.या संघात सर्वाधिक चार भारतीय महिला खेळाडूंना स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे तीन आणि न्यूझीलंड, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान मिळाले आहे. या संघात निवडलेल्या चार भारतीय खेळाडूंमध्ये स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, ऋचा घोष आणि रेणुका सिंग यांच्या नावांचा समावेश आहे.
स्मृती मंधाना – भारतीय सलामीवीर स्मृती मंधानासाठी २०२२ हे वर्ष खूप चांगले गेले. तिने २१ डावात ३३ च्या सरासरीने आणि १३३.४८च्या स्ट्राईक रेटने ५९४ धावा केल्या. या काळात तिने ५ अर्धशतकेही झळकावली. यातील एक अर्धशतक आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध झळकावले होते. बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही त्याने दोन अर्धशतके झळकावली, ज्यामुळे भारताला अनुक्रमे पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध हे दोन्ही सामने जिंकण्यात मदत झाली. २०२२ मध्ये महिला टी-२० क्रिकेटमध्ये ती चौथी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती.
दीप्ती शर्मा- दीप्तीने तिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आयसीसी महिला टी-२० संघात स्थान मिळवले आहे. तिने २०२२ मध्ये एकूण २९ विकेट घेतल्या. त्याचबरोबर ती सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत ती संयुक्तपणे तिसरी होती. त्याचबरोबर तिने फलंदाजी करताना ३७० धावा केल्या. तसेच महिला आशिया चषक २०२२ मध्ये १३ विकेट्स घेऊन ती स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली होती.
ऋचा घोष- आयसीसीने त्यांच्या संघातील भारतीय युवा प्रतिभा रिचा घोषला यष्टिरक्षकाची भूमिका सोपवली. खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिचा स्ट्राइक रेट १५० च्या पुढे राहिला. १८ सामन्यांमध्ये तिने एकूण २५९ धावा केल्या. ज्यात १३ जबरदस्त षटकारांचा समावेश आहे. गेल्या वर्षी, ब्रेबॉर्न स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिची सर्वोत्तम खेळी आली. जेव्हा तिने फक्त १९ चेंडूत ४० धावा करून भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
हेही वाचा – विराट-सचिन नव्हे तर ‘हा’ खेळाडू ऑल टाइम ग्रेटेस्ट वनडे फलंदाज, संजय मांजरेकरांचे मत
रेणुका सिंग- तिने २०२२ मध्ये २३.९५ च्या सरासरीने आणि ६.५० च्या इकॉनॉमीने एकूण २२ विकेट घेतल्या. रेणुकाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या ७ सामन्यात एकूण ८ बळी घेतले होते, तर राष्ट्रकुल खेळ आणि आशिया चषक स्पर्धेतही तिची कामगिरी उत्कृष्ट होती. तिने ११ सामन्यांत केवळ ५.२१च्या इकॉनॉमीने १७ विकेट घेतल्या.
आयसीसी महिला टी-२० टीम ऑफ द इयर २०२२: स्मृती मंधाना (भारत), बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया), सोफी डेव्हाईन (कर्णधार) (न्यूझीलंड), ऍश गार्डनर (ऑस्ट्रेलिया), ताहिला मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया), निदा दार (पाकिस्तान), दीप्ती शर्मा (भारत), ऋचा घोष (भारत), सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), इनोका रणवीरा (श्रीलंका), रेणुका सिंग (भारत)