२०१७ सालच्या चॅम्पियन्स करंडकात पाकिस्तानने भारतावर मात करत चॅम्पियन्स करंडकाचा किताब आपल्याकडे खेचून आणलाय. अंतिम सामन्यात सरफराजच्या संघाने कोहलीच्या टीम इंडियाचा १८० धावांनी दणदणीत पराभव केला. अंतिम सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या ३३९ धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी पुरती ढेपाळली. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धावांची टांकसाळ उघडणारे रथी-महारथी फलंगाज एका मागोमाग एक हजेरी लावत परत तंबूत गेले. भारताकडून एकट्या हार्दीक पांड्याने झुंज देण्याचा प्रयत्न केला.
रोहीत शर्मा, विराट कोहली या दोघांनाही मोहम्मद आमीरने झटपट बाद करुन भारताच्या फलंदाजीचा कणाच मोडून टाकला. शिखर आणि युवराज सिंहने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात ते दोघेही बाद झाले. यानंतर भरवशाचा महेंद्रसिंह धोनी काही खास कामगिरी करु शकला नाही. अवघ्या ४ धावा करत तो ही बाद झाला. यानंतर हार्दीक पांड्याने भारतासाठी विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. त्याने ७ व्या विकेटसाठी रविंद्र जाडेजासोबत ८० धावांची भागीदारी केली. या खेळीदरम्यान पांड्याने अर्धशतकी खेळीही केली. ७६ धावांच्या खेळीत पांड्याने ४ चौकार आणि ६ षटकारही ठोकले.
दरम्यान सामना जिंकण्याची पल्लवीत झालेली आशा भारतीय खेळाडूंनी स्वतः विझवून टाकली आहे. चोरटी धाव घेताना जाडेजा आणि पांड्यात नसलेल्या ताळमेळामुळे पांड्या धावचीत झाला. यानंतर पांड्याने आपली नाराजी मैदानावर प्रकट करुन दाखवली. आघाडीचे ६ फलंदाज माघारी परतल्यानंतर हार्दीक पंड्याने भारताकडून झुंज कायम ठेवली होती. रविंद्र जाडेजासोबत पांड्याने अर्धशतकी भागिदारी केली. यादरम्यान पांड्याने आपलं अर्धशतकही पुरं केलं. केवळ ४३ चेंडुंत पांड्याने ७६ धावांची खेळी केली. यात ४ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. शादाब खानच्या गोलंदाजीवर पांड्याने लागोपाट ३ षटकार ठोकले. त्यामुळे भारताच्या संपुष्टात आलेल्या आशा काही काळ पुन्हा पल्लवीत झाल्या होत्या. पांड्यापाठोपाठ जाडेजाही तंबूत परतल्याने पाकिस्तानने भारताला या सामन्यात पूरतं मागे ढकललं. यानंतर उरलेल्या फलंदाजांनी मैदानावर केवळ हजेरी लावण्याचं काम केल्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी फारसे प्रयत्न करावे लागले नाही.
पाकिस्तानकडून हसन अली आणि मोहम्मद आमीरने प्रत्येकी ३-३ बळी घेतले. त्यांना शादाब खानने २ बळी घेत चांगली साथही दिली. पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांनीही त्यांच्या गोलंदाजांना चांगली साथ दिली.
याआधी ३३९ धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा निम्मा संघ माघारी परतला आहे. भारतीय गोलंदाजांप्रमाणे भारताच्या सर्व फलंदाजांनी आझ निराशा केली. मोहम्मद आमीरने भारताच्या तीन फलंदाजांना दणके देत माघारी पाठवलं. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातला शतकवीर रोहीत शर्मा एकही धाव न काढता बाद झाला. पाठोपाठ आपल्या दुसऱ्याच षटकात आमीरने कोहलीची भंबेरी उडवली. एका चेंडुवर विराटचा झेल स्लिपमधल्या खेळाडूने सोडला, मात्र यानंतर लगेच दुसऱ्या चेंडुवर विराट कोहली बाद झाला. यानंतर शिखर धवनने युवराज सिंहच्या साथीने काहीकाळ डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ही आमीरचा शिकार झाला.
युवराज सिंहने महेंद्र सिंह धोनीच्या साथीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र शादाब खानच्या गोलंदाजीवर युवराज पायचीत झाला. पाठोपाठ भरवशाचा महेंद्रसिंह धोनी १६ चेंडुत अवघ्या ४ धावा काढून बाद झाला पाठोपाठ केदार जाधवही शादाब खानच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि भारताच्या उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आल्या.
त्याआधी पाकिस्तानने भारतासमोर ३३९ धावांचं डोंगराएवढं आव्हान ठेवलं आहे. सलामीवीर फखार झमानचं शतक, हसन अली आणि मोहम्मद हाफीजच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने एवढी मोठी मजल मारली. महत्वाच्या सामन्यात भारताचे गोलंदाज पुन्हा ढेपाळले. भुवनेश्वर कुमारचा अपवाद वगळता सर्व गोलंदाजांना आजच्या सामन्यात मार पडला. फखार झमान आणि अझर अली यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल १२८ धावांची भागीदारी करत भारतीय आक्रमणामधली हवाच काढून टाकली. सलामीवीर फखार झमानने भारतीय गोलंदाजांची पिसं काढत शतकी खेळी केली. रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर स्विप शॉटवर एक खणखणीत चौकार ठोकत फखारने आपलं शतक साजरं केलं. याच १२ चौकार आणि ३ खणखणीत षटकारांचा समावेश होता. यानंतर हार्दीक पंड्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात रविंद्र जाडेजाकडे झेल देत माघारी परतला. भारताचे सर्व प्रमुख गोलंदाज फखार झमानच्या रडारवर होते. फखारने आश्विन आणि जाडेजाला मारलेले काही षटकार तर खरचं पाहण्यासारखे होते. भारताचे सर्व प्रमुख गोलंदाज ही जोडी फोडण्यात अपयशी ठरले. अखेर दोन्ही फलंदाजांमधे झालेल्या घोळामुळे अझर अली धावचीत झाला आणि पाकिस्तानीची पहिली जोडी फुटली.अझर अलीने ५९ धावांची खेळी केली.
पहिले दोन बळी गेल्यानंतर बाबर आझम आणि शोएब मलिकने मधला काही काळ चांगले फटके खेळले. मात्र शोएब मलिक मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. भुवनेश्वर कुमारने शोएब मलिकला बाद केलं. यानंतर सेट झालेल्या बाबर आझमलाही केदार जाधवने युवराजकरवी झेलबाद केलं. या सामन्यात सर्व गोलंदाजांंना मार पडत असतानाही विराट कोहलीने केदार जाधवला तब्बल ४० व्या षटकादरम्यान गोलंगाजीसाठी बोलावलं मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. बाबर आझमने ४६ धावांची खेळी केली. यानंतर मात्र इमाद वासिम आणि मोहम्मद हाफीज यांनी पाकिस्तानला ३०० धावांचा टप्पा पार करुन दिला. हाफीजने ३७ चेंडुंमध्ये ५७ धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.
आजच्या सामन्यात सर्वच गोलंदाजांनी निराशा केली. जलदगती गोलंदाजांची होत असलेली धुलाई पाहून कोहलीने ८ व्या षटकातच अश्विनला पाचारण केलं, मात्र अझर अलीने लाँग ऑफला उत्तुंग षटकार खेचत आपण आज पूर्ण तयारीनिशी उतरलो असल्याचं सांगून दिलं. यानंतर रविंद्र जाडेजा, हार्दिक पंड्या यांनाही कोहलीने गोलंदाजीसाठी उतरवलं मात्र ही जोडी फोडण्यात त्यांनाही अपयश आलं. याआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीची काही षटकं भारतीय गोलंदाजांनी चांगली टाकली, ज्यात पाकिस्तानचे फलंदाज चाचपडताना दिसले. मात्र त्यानंतर पाकिस्तानी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला.
भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि काही प्रमाणात हार्दिक पांड्याने किफायतशीर गोलंदाजी केली. भुवनेश्वरने आपल्या सुरुवातीच्या ५ षटकांमधली २ षटकं निर्धाव टाकली होती. आपल्या गोलंदाजीत भुवनेश्वरने बाऊंसर्सचा भरणा ठेवला होता, ज्यामुळे त्याला जास्त मार पडला नाही. अखेर भुवनेश्वर कुमारनेच शोएब मलिकचा अडथळा दूर केला. हार्दिक पंड्याने फखार झमानचा महत्वपूर्ण बळी मिळवत १० षटकांमध्ये केवळ ५३ धावा दिल्या.
सुरुवातीच्या काही षटकांमध्ये चाचपडत खेळणारे पाकिस्तानी फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर चांगलेच स्थिरावले. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर फखार झमान महेंद्रसिंह धोनीकडे झेल देत माघारी परतला, मात्र तो बॉल नेमका नो-बॉल पडल्यामुळे फखार झमानला जीवदान मिळालं. यानंतर फखार झमान आणि अझर अली यांनी भारतीय गोलंदाजांवर आक्रमण करायला सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी विशेषकरुन बुमरहाला आपलं टार्गेट केलं. फखर झमानने बुमरहाच्या गोलंदाजीवर पूल, हूक आणि स्ट्रेट ड्राईव्हचे काही खास फटके मारत त्याची लयच बिघडवून टाकली. दुसरीकडे भुवनेश्वर कुमारनेही बाजू सावरण्याचा प्रयत्न केला मात्र अझर अलीने त्यालाही काही जोरदार फटके लगावले.
त्यामुळे अंतिम सामन्यात पाकिस्तानला गृहीत धरण्याची चूक टीम इंडियाला भोवली की काय असा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागलाय.
- शेवटच्या फलंदाजांकडून केवळ हजेरी लावण्याचं काम, पाकिस्तान १८० धावांनी विजयी
- चोरटी धाव घेण्याच्या नादात पांड्या बाद
- पांड्या-जाडेजाची ८० धावांची भागीदारी, पांड्याचं झुंजार अर्धशतक
- धोनीकडून १६ चेंडुंत अवघ्या ४ धावा, हसन अलीच्या गोलंदाजीवर बाद
- युवराजकडून डाव सावरण्याचा प्रयत्न, मात्र शादाब खानच्या गोलंदाजीवर बाद
- शिखर धवनकडून डाव सावरण्याचा प्रयत्न, आमीरने धवनलाही धाडलं माघारी
- लगेच दुसऱ्या चेंडुवर पॉईंटच्या खेळाडूकडे झेल देत विराट माघारी, आमीरचा भारताला धक्का
- विराट कोहलीला स्लिपमध्ये जीवदान
- रोहीत शर्मा भोपळा न फोडता माघारी
- मोहम्मद हाफीजचं धडाकेबाज अर्धशतक
- हाफीज-इमाद वासिमची फटकेबाजी, पाकिस्तान ३०० पार
- केदार जाधवने मिळवून दिला भारताला ब्रेक-थ्रू, बाबर आझमला केलं बाद
- भुवनेश्वरकडून शोएब मलिकचा अडथळा दूर
- बाबर आझम – शोएब मलिक जोडगोळी मैदानात
- अखेर हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर फखार झमान माघारी
- प्रमुख गोलंदाज अपयशी होत असूनही, केदार जाधवला संधी नाही
- भारतीय क्षेत्ररक्षकांकडून अंतिम सामन्यात पुन्हा निराशा
- पहिल्या विकेटसाठी फखर झमान-अझर अलीची शतकी भागिदारी
- सर्व प्रमुख गोलंदाजांच्या गोलंदाजीवर पाक सलामीवीरांचे मोठे-मोठे फटके
- मिळालेल्या जीवदानानंतर पाक फलंदाजांचा भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल
- जसप्रीत बुमरहाच्या गोलंदाजीवर फखार झमानला जीवदान
- सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांचा टिच्चून मारा