विश्वचषक 2019 मधील उपांत्य फेरीचा भारत विरूद्ध न्यूझीलंड हा पहिला सामना आज ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राऊंडवर रंगणार आहे. यापूर्वी 14 जून 1975 रोजी विश्वचषकात ओल्ड ट्रॅफर्डमध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकातील सामना रंगला होता. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राऊंडवर विश्वचषकात भारत विरूद्ध न्यूझीलंड असा सामना झाला नाही.

14 जून 1975 रोजी झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाकडून एकाच खेळाडूनं अर्धशतक ठोकले होते. सईद आबिद अली यांनी या सामन्यात 70 धावांची खेळी केली होती. या मैदानावर न्यूझीलंडविरोधातील कोणत्याही भारतीय खेळाडूची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच त्यावेळी भारताची सलामी जोडी स्वस्तात तंबूत परतली होती. सुनील गावस्कर 12 धावांवर बाद झाले होते. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडपुढे 230 धावांचे आव्हान ठेवले होते. 6 गड्यांच्या मोबदल्यात न्यूझीलंडने ही धावसंख्या गाठली होती.

न्यूझीलंडच्या जी.एम.टर्नर यांनी 114 धावांची खेळी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला होता. तर भारताकडून अबिद अली यांनी सर्वाधिक 70 तर अंशुमन गायकवाड यांनी 37 धावा केल्या होत्या. विश्वचषक 2019 मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राऊंडवर भारत आपला तिसरा सामना खेळणार आहे. यापूर्वी खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला होता. तसेच 19 जून रोजी पाकिस्तानलाही भारताने या मैदानावर धुळ चारली होती. भारताने या सामन्यात 89 धावांनी पाकिस्तानचा पराभव केला होता. तर वेस्ट इंडिजचा भारताने 125 धावांनी पराभव केला होता. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये खेळवण्यात आलेल्या पाचही सामन्यांमध्ये पहिले फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळाल आहे. त्यामुळे या सामन्यात टॉस महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.