शादाब खान, वहाब रियाझ आणि मोहम्मद आमिर यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर ४९ धावांनी मात केली आहे. ३०९ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला आफ्रिकेचा संघ २५९ धावांपर्यंतच मजल मारु शकला. कर्णधार फाफ डु प्लेसिस, क्विंटन डी-कॉक आणि मधल्या फळीत वॅन डर डसन यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज पाकिस्तानच्या माऱ्याचा सामना करु शकला नाही. डु प्लेसिसने ६३ धावा करुन झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न तोकडेच पडले. या पराभवासह आफ्रिकेच्या उपांत्य फेरीत पोहचण्याच्या आशांवरही पाणी फिरलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसऱ्याच षटकात मोहम्मद आमिरने हाशिम आमलाला माघारी धाडत आफ्रिकेला मोठा धक्का दिला. यानंतर क्विंटन डी-कॉक आणि फाफ डु प्लेसिस यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचत आफ्रिकेचा डाव सावरला. यादरम्यान दोन्ही फलंदाजांनी पाकिस्तानी आक्रमणाचा सुरेख सामना करत आणि चांगले फटके खेळले. शादाब खानने क्विंटन डी-कॉकला माघारी धाडत आफ्रिकेची जमलेली जोडी फोडली. डी-कॉकने ४७ धावा केल्या. यानंतर मैदानात आलेला एडन मार्क्रमही फारशी चमक दाखवू शकला नाही.

कर्णधार डु प्लेसिसने मात्र एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक साजरं केलं. मात्र मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर तो सरफराजकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर फटकेबाजी करण्यात निष्णात असलेल्या डेव्हिड मिलर आणि ख्रिस मॉरिसलाही अपेक्षित खेळी करता आली नाही. अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी धावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानी गोलंदाजांनी सामन्यावरची आपली पकड ढिली होऊ दिली नाही. पाकिस्तानकडून शादाब खान आणि वहाब रियाझने प्रत्येकी ३-३, तर मोहम्मद आमिरने २ आणि शाहीन आफ्रिदीने १ बळी घेतला.

दरम्यान, भारताविरुद्ध स्विकाराव्या लागलेल्या पराभवानंतर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दमदार पुनरागमन केलं. फलंदाजांनी केलेल्या सांघिक प्रयत्नाच्या जोरावर पाकिस्तानने आफ्रिकेविरोधात ३०८ धावांची मजल मारली. हारिस सोहेल आणि बाबर आझम यांनी अर्धशतकी खेळी करुन संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्यात हातभार लावला. त्यांना सलामीवीर फखार झमान, इमाम उल हक यांनी प्रत्येकी ४४ धावा करुन चांगली साथ दिली. इम्रान ताहीरचा अपवाद वगळता आफ्रिकेचे सर्व गोलंदाज आज महागडे ठरले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार सरफराज अहमदचा निर्णय पाकिस्तानच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. फखार झमान आणि इमाम उल-हक या जोडीने पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. एन्गिडी, रबाडा, फेलुक्वायो, ताहीर यासारख्या गोलंदाजांना तोंड देत पाकिस्तानी जोडीने धडाकेबाज सुरुवात केली. इम्रान ताहीरने या दोन्ही फलंदाजांना माघारी धाडत पाकिस्तानची जमलेली जोडी फोडली.

अवश्य वाचा – World Cup 2019 : इम्रान ताहीरची गाडी सुसाट, पाकविरुद्ध सामन्यात विक्रमाची नोंद

यानंतर बाबर आझमने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेतली. मोहम्मद हाफीज झटपट माघारी परतला. यानंतर हारिस सोहेलच्या साथीने बाबरने ८१ धावांची भागीदारी रचत पाकच्या डावाला आकार दिला. बाबरने ६९ तर हारिस सोहेलने ८९ धावांची खेळी केली. अखेरच्या फळीतील फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दिली नाही. आफ्रिकेकडून एन्गिडीने ३, इम्रान ताहीरने २ तर फेलुक्वायो आणि मार्क्रमने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc cricket world cup 2019 pakistan vs south africa lords psd
First published on: 23-06-2019 at 18:59 IST