Rishabh Pant Breach ICC Code of Conduct in IND vs ENG Headingley Test : इंग्लंडमधील लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळवला जात असून हा सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. आज या सामन्याचा पाचवा दिवस असून इंग्लंडला विजयासाठी ९० षटकांमध्ये ३५० धावांची आवश्यकता आहे. या सामन्याच्या पहिल्या चार दिवसांमध्ये अनेक थरारक गोष्टी घडल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मैदानातील पंचांबरोबर वाद घालणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) फटकारलं आहे.

एका बाजूला कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावून संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या ऋषभला आयसीसीने मैदानातील वागणुकीमुळे फटकारलं आहे. ऋषभ पंतने आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं निष्पन्न झालं आहे. याबाबत आयसीसीने म्हटलं आहे की “पंतने खेळाडू व त्यांच्या सपोर्ट स्टाफसाठीच्या आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.८ चं उल्लंघन केलं आहे”. पंतने सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयाशी असहमती व्यक्त केली होती. तसेच त्याने चेंडू जमिनीवर आपटून निषेध व्यक्त केला होता. हा शिस्तभंग असल्याचं आयसीसीने म्हटलं आहे. परिणामी त्याच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडण्यात आला आहे. गेल्या २४ महिन्यांत पहिल्यांदाच त्याने अशा प्रकारे आयसीसीच्या नियमाचं उल्लंघन केलं आहे.

दरम्यान, पंतने त्याची चूक कबूल केली आहे आणि आयसीसीचे मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी सुनावलेली प्रस्तावित शिक्षा देखील त्याने स्वीकारली आहे. त्यामुळे ऋषभवर मोठी कारवाई केलेली नाही. मैदानावरील पंच ख्रिस गॅफनी, पॉल रायफल यांच्यासह तिसरे पंच शारफुद्दौला इब्ने शाहीद व चौथे पंच माइक बर्न्स यांनी ऋषभची तक्रार केली होती. त्यानंतर आयसीसीची आचारसंहिता लेव्हल-१ चं उल्लंघन केल्याप्रकरणी ऋषभवर सौम्य कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकरणात फटकारणे, सामना शुल्कापैकी ५० टक्के रक्कम दंड म्हणून आकारणे किंवा शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डीमेरिट पॉइंट जोडणे यापैकी एक शिक्षा सुनावली जाते.

Rishabh Pant Throws Ball in Anger After Umpire Declines Ball Changer Request IND vs ENG Video
ऋषभ पंत पंचांवर संतापला (फोटो-X)

ऋषभने नेमकं काय केलं होतं?

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजीवेळी ऋषभ पंत पंचांशी बोलताना दिसला. त्यानंतर पंचांच्या उत्तराने सहमत नसल्याने त्याने थेट चेंडू फेकून दिला. भारताच्या उपकर्णधाराने पंचांकडे चेंडू बदलण्याची विनंती केली होती, जी पंचांनी नाकारल्यानंतर पंतने पंच पॉल रयफल यांच्यासमोरच चेंडू जमिनीवर फेकला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्पूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने चेंडूच्या आकाराबाबत प्रश्न उपस्थित केले होते. तसेच त्याने पंचांना तो बदलण्याची विनंती केली होती. पंचांनी दोन वेळा गेजने चेंडू तपासला आणि नियमांनुसार चेंडू योग्य असल्याचे सांगितले, तसेच चेंडू बदलण्यास नकार दिला. यावेळी जसप्रीत बुमराह देखील पंचांशी बोलताना दिसला, परंतु, पंचांनी आपला निर्णय बदलला नाही. इंग्लंडच्या ६३ व्या षटकात ऋषभने आपल्या गोलंदाजांची मागणी लावून धरली. मात्र, पंचांनी त्याची मागणी फेटाळल्यानंतर ऋषभने चेंडू जमिनीवर फेकून दिला.