आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ऑक्टोबर महिन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ यासाठी नामांकन प्राप्त झालेल्या खेळांडूची नावे गुरुवारी जाहीर केली आहेत. यामध्ये भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावाचा समावेश आहे. विराट कोहलीला पहिल्यांदाचा आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी नामांकन मिळाले आहे. त्याचबरोबर या यादीत सिकंदर रझा आणि डेव्हिड मिलर यांचीही नावे आहेत.

विराट कोहली –

विराट कोहलीने गेल्या महिन्यात फक्त चार डाव खेळले. पण यादरम्यान त्याने तीन संस्मरणीय खेळी खेळल्या, त्यापैकी एक पाकिस्तानविरुद्ध ८२ धावांची नाबाद खेळी होती. विराट कोहलीने या खेळीचे वर्णन पाकिस्तानविरुद्ध खेळलेली सर्वोत्तम खेळी असल्याचे म्हटले आहे. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने सामन्यात ३१ धावांवर ४ विकेट गमावल्या. पण डाव सावरताना कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावांची अविश्वसनीय खेळी खेळत संघाला विजय मिळवून दिला.

याशिवाय विराट कोहलीने महिन्याच्या सुरुवातीला गुवाहाटी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २८ चेंडूत नाबाद ४९ धावांची दमदार खेळी केली होती. कोहलीने २०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्धही दमदार खेळी केली होती. त्याने ४४ चेंडूत ६२ धावा केल्या. मात्र, आफ्रिकेविरुद्ध तो स्वस्तात बाद झाला. या सामन्यात त्याने १२ धावा केल्या. कोहलीने ऑक्टोबर महिन्यात २०५ च्या सरासरीने २०५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १५०.७३ चा राहिला आहे.

डेव्हिड मिलर –

दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज डेव्हिड मिलर यंदा उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ऑक्टोबरमध्ये त्याने गुवाहाटीमध्ये भारताविरुद्ध ४७ चेंडूत १०६ धावांची दमदार इनिंग खेळली होती, पण संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, २०२२ च्या टी-२० विश्वचषकात त्याने पर्थमध्ये भारताविरुद्ध नाबाद ५९ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. डावखुऱ्या फलंदाजाने ऑक्टोबरमध्ये १४६.३७च्या स्ट्राइक रेटने ३०३ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : विराट कोहलीने खोटं क्षेत्ररक्षण केले की नाही? यावर आकाश चोप्राने मांडले आपले मत, म्हणाला…..!

सिकंदर रझा –

झिम्बाब्वेचा स्टार अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा याने ऑक्टोबरमध्ये संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. रझाने टी-२० विश्वचषकातही आपली कामगिरी दाखवून दिली की तो मोठा खेळाडू आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात त्याने ४७ चेंडूत ८२ धावा केल्या आणि सामन्यात २२ धावांत एक विकेट घेतली. स्कॉटलंडविरुद्धही त्याने २३ चेंडूत ४० धावा केल्या आणि २० धावांत एक विकेट घेतली. रझा वेस्ट इंडिजविरुद्ध फलंदाजीत फार काही करू शकला नाही, पण पाकिस्तानविरुद्धच्या विजयात त्याने मोलाची भूमिका बजावली. त्याने पाकिस्तानविरुद्ध ३५ धावांत तीन विकेट घेतल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.