पुढील महिन्यापासून युएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप सामने होणार आहेत. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत १६ संघ सहभागी होत आहेत. बीसीसीआय स्पर्धेचा आयोजक आहे. आयपीएल २०२१ च्या सामन्यादरम्यान चाहते स्टेडियममध्ये येऊ लागले आहेत. आता भारतीय क्रिकेट मंडळ आणि अमीरात क्रिकेट मंडळ २५,००० चाहत्यांना वर्ल्डकप फायनलसाठी बोलावण्याची तयारी करत आहे. मात्र, यासाठी त्यांना यूएईच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. वर्ल्डकप स्पर्धा ही आधी भारतात होणार होती, पण करोनामुळे ती यूएईमध्ये हलवण्यात आली.

वर्ल्डकपचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तथापि, सध्या यूएईमध्ये केवळ १० टक्के चाहत्यांना परवानगी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘बीसीसीआय आणि एमिरेट्स बोर्डला फायनलसाठी मोठ्या संख्येने चाहत्यांना आमंत्रित करायचे आहे. जर सर्व प्रोटोकॉल लक्षात ठेवून परवानगी दिली गेली, तर ती चांगली ठरेल. मात्र, परवानगीबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही.या स्पर्धेच्या पहिल्या फेरीचे सामनेही ओमानमध्ये होणार आहेत.’

नियम काय सांगतात?

आयपीएल दरम्यान दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी चाहत्यांना पीसीआर चाचणी करण्याची गरज नाही. त्यांना फक्त करोना लसीकरणाच्या दोन्ही डोसचे पुरावे द्यावे लागतील. दुसरीकडे, शारजाहचे नियम वेगळे आहेत. येथे केवळ १६ वर्षांवरील प्रेक्षकांना प्रवेश मिळेल. याशिवाय, लसीकरण प्रमाणपत्र आणि पीसीआर चाचणीचा निकाल देखील सोबत आणावा लागेल. अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर, १६ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या चाहत्यांना लसीकरणाचा पुरावा द्यावा लागेल. यासह, पीसीआर चाचणी देखील सोबत घ्यावी लागेल. जर कोणी एकदा स्टेडियमच्या बाहेर गेला असेल तर त्याला परत येऊ दिले जाणार नाही.

हेही वाचा – IPL 2021 : “माझी बायको मला…”, CSKच्या चाहत्यानं स्टेडियममध्ये दाखवला गमतीशीर फलक

टीम इंडियाने २००७ पासून टी-२० वर्ल्डकप जिंकलेला नाही. दुसरीकडे पाच वेळा वनडे वर्ल्डकप जेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. स्पर्धेचा हा सातवा हंगाम असून वेस्ट इंडिज स्पर्धेचा गतविजेता आहे आणि त्याने दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड हे देखील प्रत्येकी एकदा विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाले आहेत.