करोना संकटामुळे विश्वचषकाचं आयोजन यूएईत करण्यात आलं आहे. टी २० विश्वचषकासाठी अवघे काही दिवस उरल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदाचा विश्वचषकासाठी कोणता संघ दावेदार असेल?, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये ७० टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. आयसीसी आणि यजमान बीसीसीआयला यूएई सरकारकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. स्पर्धा १४ नोव्हेंबरपर्यंत दुबईत आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी या स्पर्धेचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. मात्र करोनामुळे बीसीसीआयने स्पर्धा यूएईत स्थलांतरीत केली आहे. असं असलं तरी या स्पर्धेचं आयोजन बीसीसीआय करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टी २० विश्वचषकाला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. २४ ऑक्टोबरला दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे. आयसीसीने ३ ऑक्टोबरपासून तिकिटांची विक्री सुरु केली आहे. सर्वात स्वस्त तिकीट दर हा ६०० रुपये इतका आहे. मात्र भारत विरूद्ध पाकिस्तान या हायवोल्टेज सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी एका तिकिटासाठी लाखो रुपये मोजत आहेत. तिकीट ३३३ टक्के अधिक महाग विकलं जात आहे. क्रिकेटप्रेमी https://www.t20worldcup.com/tickets या संकेतस्थळावर जाऊन तिकीट खरेदी करू शकतात. या सामन्यासाठी सर्वात महाग तिकिटाचा दर हा २ लाख रुपये इतका आहे. सामान्य तिकिटापेक्षा ३३३ टक्के अधिक किमत आहे. वेगवेगळ्या स्टँडसाठी वेगवेगळी किमत आहे. तिकिटाची सुरुवात १२,५०० पासून आहे. या व्यतिरिक्त ३१,२०० आणि ५४,१०० रुपयात क्रिकेटप्रेमी प्रीमियम आणि प्लॅटिनम स्टँडचं तिकीट खरेदी करू शकतात. या तिन्ही कॅटेगरीचे तिकिटं जवळपास संपली आहेत. स्काय बॉक्स आणि वीआयपी स्वीटच्या किमती अधिकृत वेबसाईटवर दिसत नाहीत. मात्र भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या ३१ ऑक्टोबरच्या सामन्यासाठी वीआयपी स्वीटची किमत १ लाख ९६ हजार रुपये आहे. हा दर पाहता भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट दर महाग असण्याची शक्यता आहे. कारण भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी सर्वात कमी दर असलेलं तिकीट १०,४०० रुपये आहे.

टी-२० वर्ल्डकप स्टेडियममध्ये बसून पाहायचाय?; ‘अशी’ मिळवा तिकिटे

नियम काय सांगतात?

आयपीएल दरम्यान दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी चाहत्यांना पीसीआर चाचणी करण्याची गरज नाही. त्यांना फक्त करोना लसीकरणाच्या दोन्ही डोसचे पुरावे द्यावे लागतील. दुसरीकडे, शारजाहचे नियम वेगळे आहेत. येथे केवळ १६ वर्षांवरील प्रेक्षकांना प्रवेश मिळेल. याशिवाय, लसीकरण प्रमाणपत्र आणि पीसीआर चाचणीचा निकाल देखील सोबत आणावा लागेल. अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर, १६ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या चाहत्यांना लसीकरणाचा पुरावा द्यावा लागेल. यासह, पीसीआर चाचणी देखील सोबत घ्यावी लागेल. जर कोणी एकदा स्टेडियमच्या बाहेर गेला असेल तर त्याला परत येऊ दिले जाणार नाही.

टीम इंडियाने २००७ पासून टी-२० वर्ल्डकप जिंकलेला नाही. दुसरीकडे पाच वेळा वनडे वर्ल्डकप जेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. स्पर्धेचा हा सातवा हंगाम असून वेस्ट इंडिज स्पर्धेचा गतविजेता आहे आणि त्याने दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड हे देखील प्रत्येकी एकदा विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc t20 world cup india vs pakistan match ticket rate rmt
First published on: 04-10-2021 at 17:57 IST