Mark Wood Bouncer Video: विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघ इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेतील चौथा सामना गुरुवारी खेळवण्यात आला. ज्यामध्ये पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजीला आला होता. ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडचा भेदक गोलंदाज मार्क वूडने पाकिस्तानचा फलंदाज आझम खानला बाऊन्सरवर विचित्र पध्दतीने बाद केले,ज्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाकिस्तानच्या डावातील ११व्या षटकात हा प्रकार घडला. शादाब खान गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर आझम खान फलंदाजीसाठी उतरला होता. चार चेंडू खेळले असूनही त्याला एकही धाव घेता आली नव्हती. मार्क वुडने त्याच्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर भयंकर बाऊन्सर टाकला. या चेंडूवर आझम खानने डोळे बंद करत बॅट वर करतो पण तो यष्टीरक्षकाकडून झेलबाद झाला. या चेंडूचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. वुडच्या या शॉर्ट पिच चेंडूचा वेग इतका आहे की, आझम खान स्वत:ला वाचवू शकेल तोपर्यंत चेंडू त्याच्या ग्लोव्हजला लागला होता.

हेही वाचा – न्यूयॉर्कमध्ये ‘ढगाला लागली कळ…’ भर पावसात रोहित-द्रविडची पळापळ, VIDEO व्हायरल

ग्लोव्हजला लागल्यानंतर चेंडू थेट जोस बटलरच्या हातात गेला आणि त्याने झेल घेऊन आझम खानला पॅव्हेलियनमध्ये धाडले. बटलरच्या अपीलनंतर आझमला मैदानावरील पंचांनी बाद घोषित केले. हा चेंडू त्याच्या खांद्याला लागल्याचे आझमला वाटले. त्यामुळे तो थोडा गोंधळला. तिसऱ्या पंचांनी रिव्ह्यूमध्ये तपासले असता, आझमच्या जवळून गेलेला हा चेंडू त्याच्या ग्लोव्हजला लागल्याने तो बाद झाला. आझम खान ५ चेंडूत खाते न उघडता बाद झाला. या सामन्यात वुडही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने ४ षटकांत ३५ धावा दिल्या आणि २ विकेट घेतले.

आझमने यष्टीरक्षण करतानाही सोपा झेल सोडला आणि ज्यामुळे हारिस रौफही चांगलाच वैतागलेला दिसला. इंग्लंडच्या विस्फोटक सुरुवातीनंतर संघ विकेटच्या शोधात असताना आझमने सोपा झेल सोडला. ९व्या षटकात हॅरिस रौफच्या चेंडूवर विल जॅकने पुल शॉट खेळला पण चेंडू बॅटची कड घेऊन थेट आझमकडे गेला. सोपा झेल असूनही आझमने तो सोडला. मात्र, षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जोस बटलरचा सोपा झेल घेऊन आझमने त्याची भरपाईही निश्चित केली.

हेही वाचा – गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा प्रक्षिक्षक होण्याच्या चर्चेदरम्यान गांगुलीने BCCI चे कान टोचले; म्हणाला, “थोडं समजुतदारपणे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आझम खान याआधी २५ मे रोजी झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यातही फ्लॉप झाला होता. तो केवळ ११ धावा करून बाद झाला. टी-२० विश्वचषकापूर्वी आझम खानच्या फॉर्ममुळे पाकिस्तान संघाची चिंता वाढली आहे. पाकिस्तानचा संघ विश्वचषकाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश करतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.