Sunil Gavasakar Backs Up Rohit Sharma After IND vs AFG: T20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या १० खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडूंपैकी एकही खेळाडू स्थान मिळवू शकणार नाही,असं कुणाला वाटलं तरी असेल का? आयपीएलमध्ये ७४१ धावा करणारा विराट कोहली ते भारतीय कर्णधार रोहित शर्मा यंदा टीम इंडियाच्या फलंदाजांना विश्वचषकात कमाल दाखवता आली नाही हे आता पूर्ण स्पष्ट झालं आहे. अगदी सुपर ८ मधील पहिला सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तानमध्ये सुद्धा रोहित शर्मा अगदीच स्वस्तात बाद झाला होता विशेष म्हणजे या सामन्यात सुद्धा डावखुरा फझलहक फारुकी रोहितच्या बाद होण्याचं कारण ठरला. यामुळे पुन्हा एकदा रोहित शर्माच्या डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध चालू असलेल्या संघर्षावर चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरून टीका करणाऱ्यांना आता स्वतः सुनील गावसकर यांनी सुनावलं आहे. इतकंच नाही तर रोहितच्या अनुभवाविषयी, कर्तबगारीविषयी सुद्धा गावसकर यांनी कौतुकाचे पूल बांधले आहेत.

टी २० विश्वचषकाच्या सुपर आठ टप्प्यात भारताने अफगाणिस्तानवर आरामात विजय मिळवला असला तरी रोहितची विकेट पाहता त्याच्यावर प्रचंड टीका होतेय. यावर उत्तर देताना गावसकर यांनी १५० पेक्षा जास्त टी २० आणि २६० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सह, रोहित हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी फलंदाजांपैकी एक आहे याची आठवण करून दिली.

‘तुम्ही रोहित शर्माला ‘ही’ गोष्ट सांगू शकत नाही’ – गावसकर

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावसकर यांनी म्हटले की, “तो अनुभवी फलंदाज आहे. त्याला माहित आहे की त्याला काय करायचे आहे. गोलंदाजाच्या अँगलनुसार तुम्ही रोहित शर्माला खेळ बदलण्यास सांगू शकत नाही. तुम्ही काहीवेळा असं म्हणू शकता की कदाचित गोलंदाजाने ज्या कोनातून चेंडू टाकला त्यावर असा शॉट मारायला नको होता. किंवा कदाचित अतिरिक्त कव्हरवर इनसाइड-आउट शॉट खेळण्याचा प्रयत्न करायला हवा होता. खरंतर या गोष्टी जी व्यक्ती मैदानात खेळात असते त्याला खेळताना समजतात, त्यानुसार बदल घडत जातात पण आपल्याकडे काहींना फक्त घरी बसून मी तिथे असतो तर असं केलं असतं, तसं केलं असतं असाच विचार करता येतो.”

गावसकर असेही म्हणाले की, “मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भरपूर अनुभव असलेल्या माणसाला इतरांनी सल्ला देण्याची गरजच नाही. तो आउट झाला हे खरं आहे पण प्रत्येक फलंदाज कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाद होणारच असतो. आता एखादा जर स्टंप आउट झाला तर आपण काय असं म्हणणार का की तो स्टंपच्या समोर दुबळाच आहे. जर एखाद्याने त्याच्या करिअरमध्ये १०- १५ हजार धावा केल्या असतील आणि ४० वेळा क्लीन बोल्ड झाला असेल तर याचा अर्थ असा होत नाही की तेच त्याचे दुबळेपण आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहितचा टी २० वर्ल्डकप मधील खेळ कसा आहे?

भारताचा कर्णधार रोहितला अफगाणिस्तानच्या फारुकीने भारतीय डावाच्या दुसऱ्याच षटकात बाद केले. रोहितने १३ चेंडूत आठ धावा केल्या, तरीही टीम इंडियाने २० षटकांत १८१ – ८ अशा धावांसह सामना जिंकला. भारतीय कर्णधाराने टी-२० विश्वचषकाच्या यंदाच्या आवृत्तीत केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. रोहितने २५.३३ च्या सरासरीने आयसीसी स्पर्धेत चार सामन्यांत ७६ धावा केल्या आहेत.