Afganistan Cricket Team: अफगाणिस्तान संघाने पापुआ न्यू गिनीचा ७ गडी राखून पराभव करत टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर८ फेरीत प्रवेश केला आहे. रशीद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान संघ यंदाच्या टी-२० विश्वचषकात चांगली कामगिरी करत आहे. या संघाने आतापर्यंत खेळलेले तिन्ही सामने जिंकले आहेत. मात्र आता सुपर८ पूर्वीच अफगाणिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे.
ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, अफगाणिस्तान संघाचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमानच्या बोटाला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो स्पर्धेतील उर्वरित सामने खेळू शकणार नाही. मुजीब विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात युगांडाविरुद्ध खेळला होता, मात्र त्यानंतर दुखापतीमुळे तो पुढील खेळू शकला नाही. ही दुखापत त्याच्या गोलंदाजीच्या हाताच्या तर्जनीला आहे. त्याच्या जागी नूर अहमद प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळला. नूरने न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनीविरुद्ध १-१ विकेट घेतली. नूरने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ४ षटकांत १ विकेट घेत १४ धावा दिल्या होत्या. तर पीएनजीविरूद्धच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा किपलिन डोरिगा याला गुगलीने पायचीत केले.
मुजीब उर रहमानच्या जागी सलामीवीर फलंदाज हजरतुल्ला झाझाईचा अफगाणिस्तान संघात समावेश करण्यात आला आहे. ICC शुक्रवारी सांगितले की पापुआ न्यू गिनीवर अफगाणिस्तानच्या विजयानंतर संघात बदल करण्यासाठी अफगाणिस्तानला परवानगी दिली आहे. झाझाईने अफगाणिस्तान संघासाठी आतापर्यंत ४३ टी-२० सामन्यांमध्ये ११३८ धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तो संघाची फलंदाजी बाजू अधिक बळकट करेल. फेब्रुवारीपासून तो एकही टी-२० सामना खेळला नाही, पण गेल्या दोन टी-२० विश्वचषकांमध्ये तो खेळला आहे.
Mujeeb Ur Rahman has been ruled out of the 2024 T20 World Cup due to a recurring finger injury. Opener Hazratullah Zazai replaces him. pic.twitter.com/2gdmSZb7WP
— Don Cricket ? (@doncricket_) June 15, 2024
अफगाण संघाने २०२४ च्या सुपर८ मध्ये स्थान निश्चित केले आहे. जिथे त्यांचा सामना २० जूनला भारतीय संघाशी होणार आहे. सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात अफगाणिस्तान संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संघाने युगांडाविरुद्ध १२५ धावांनी, बलाढ्य न्यूझीलंडविरुद्ध ८४ धावांनी आणि पापुआ न्यू गिनीविरुद्ध ७ गडी राखून विजय मिळवला. संघाला गटातील शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळायचा आहे. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघही सुपर८ मध्ये पोहोचले आहेत.