नवी मुंबई : दुखापतीमुळे प्रतिका रावलला विश्वचषक स्पर्धेतून बाहेर जावे लागणे हे दुर्दैवी होते. तिच्यासाठी मला नक्कीच वाईट वाटते आहे. मात्र, बदली खेळाडू म्हणून मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे, अशी प्रतिक्रिया शफाली वर्माने व्यक्त केली.

महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अखेरच्या साखळी लढतीत बांगलादेशविरुद्ध क्षेत्ररक्षणादरम्यान प्रतिकाला दुखापत झाली. गुडघा आणि घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे तिला उर्वरित स्पर्धेला मुकावे लागणार असून तिची जागा शफाली घेईल. शफालीला तडकाफडकी बोलवून घेण्यात आले, त्यावेळी ती राष्ट्रीय ट्वेन्टी-२० स्पर्धेत हरियाणाचे नेतृत्व करत होती. तिने सूरतहून त्वरित नवी मुंबई गाठले आणि दोन दिवस कसून सराव केल्यानंतर ती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यासाठी सज्ज झाली आहे.

‘‘अन्य एखाद्या खेळाडूला अशा प्रकारे दुखापत झाल्याचे पाहून मलाही खूप दु:ख झाले. मात्र, देवाने काहीतरी चांगले काम करण्यासाठी मला इथे पाठवले आहे. या संधीसाठी मी पूर्णपणे तयार आहे. मी देशांतर्गत क्रिकेट खेळत होते आणि यशस्वी कामगिरी करत होते. मला राष्ट्रीय संघासाठी खेळण्याचा अनुभव आहे. मी याआधी (ट्वेन्टी-२०) विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही खेळले आहे. आता मी मानसिकदृष्ट्या कणखर राहिले आणि आत्मविश्वास राखला, तर नक्कीच महत्त्वाची खेळी करू शकेन,’’ असे २१ वर्षीय शफाली म्हणाली.

कसोटी आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या शफालीला एकदिवसीय प्रारूपात अद्याप फारसे यश लाभलेले नाही. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये २९ सामन्यांत तिने केवळ २३च्या सरासरीने ६४४ धावा केल्या आहेत. परंतु आता कामगिरीत सुधारणा करण्यासाठी ती तयार आहे. ‘‘मी गेले दोन दिवस फलंदाजीचा बराच सराव केला. यावेळी मी चांगले चेंडू मैदानालगत मारण्याचा प्रयत्न करत होते. तसेच गोलंदाजाने चूक केल्यास चेंडू सीमारेषेबाहेर पाठवत होते. मी योग्य तयारी केली आहे. त्यामुळे उपांत्य सामन्यापूर्वी माझा आत्मविश्वास उंचावलेला आहे,’’ असे शफालीने नमूद केले.