न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सराव सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारतीय संघाने दणक्यात पुनरागमन केलं आहे. कार्डीफच्या मैदानावर दुसऱ्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशचा ९५ धावांनी धुव्वा उडवला. महेंद्रसिंह धोनी आणि लोकेश राहुल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ३५९ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशच्या फलंदाजांनी चांगली झुंज दिली, मात्र कुलदीप यादव-युजवेंद्र चहलच्या फिरकी माऱ्यासमोर बांगलादेशचा संघ मोठी मजल मारु शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी महेंद्रसिंह धोनीचं फॉर्मात येणं ही भारतासाठी आश्वासक बाब मानली जात आहे. कार्डीफमध्ये भारत विरुद्ध बांगलादेशदरम्यान रंगलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने पहिले फलंदाजीचा निर्णय घेत बांगलादेशसमोर ३५९ धावांचे लक्ष्य ठेवले. यादरम्यान, लोकेश राहुल यानेदेखील चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी येत  ९९ चेंडूंमध्ये १०८ धावा ठोकल्या. यामध्ये १२ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. त्यातच महेंद्रसिंह धोनीनेही शतक ठोकत आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन केले.

भारताने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीच्या काही षटकांमध्येच बांगलादेशच्या गोलंदाजांनी रोहित शर्मा आणि शिखर धवनला माघारी धाडले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि विजय शंकरदेखील माघारी परतले. कोहलीने ४७ तर विजय शंकरने २ धावा केल्या. यानंतर धोनीने उत्तम फलंदाजी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. केवळ ७८ चेंडूंमध्ये ११३ धावांची तुफानी खेळी करत धोनीने भारतीय संघाला ३५० धावांपर्यंत नेऊन पोहोचवले. त्याने ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ११३ धावा केल्या.

यापूर्वी न्यूझीलंडसोबत झालेल्या सराव सामन्यात लोकेश राहुल आणि महेंद्रसिंह धोनी यांनी निराशाजनक कामगिरी केली होती. त्या सामन्यात धोनी १७ धावा करून तर लोकेश राहुल ६ धावा करून बाद झाला होता.

प्रत्युत्तरादाखल बांगलादेशच्या सलामीवीरांनी डावाची सुरुवात चांगली केली. लिटन दास आणि सौम्य सरकार यांनी फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. बुमराहने सौम्या सरकारचा अडसर दूर करत बांगलादेशला पहिला धक्का दिला. यानंतर शाकीब अल हसन आणि मोहम्मद मिथून यांना फारशी चमक दाखवता आली नाही. मात्र सलामीवीर लिटन दासने मुश्फिकूर रहीमच्या साथीने संघाचा डाव सावरला. दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. लिटन दास ७३ धावांवर चहलच्या गोलंदाजीवर यष्टीचीत होऊन माघारी परतला. तर कुलदीप यादवने मुश्फिकुर रहीमचा त्रिफळा उडवला. यानंतर बांगलादेशच्या डावाला गळती लागली. अखेरच्या फळीतले फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकले नाहीत. भारताकडून चहल, कुलदीप आणि जसप्रीत बुमराह यांनी आश्वासक मारा केला.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc world cup 2019 ind vs ban warm up match dhoni rahul scrores century
First published on: 28-05-2019 at 20:47 IST