शनिवारी न्यूझीलंड विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तानचा संघ 41.1 षटकात 172 धावा करून तंबूत परतला. तर न्यूझीलंडने 3 गड्यांच्या मोबदल्यात 32.1 षटकांमध्ये 173 धावा करत विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंडचा हा तिसरा विजय असून या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडचा संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात डगमगत झाली. पहिल्याच चेंडूवर मार्टिन गप्टीलच्या रूपात त्यांना पहिला झटका लागला. आलमच्या चेंडूवर नजिबुल्लाने झेल घेत गप्टीलला माघारी धाडले. यानंतर कॉलिन मुनरो (22) आणि केन विल्यमसने (नाबाद 79) ने दुसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागिदारी केली. मुनरोने 24 चेंडूंमध्ये 22 धावा केल्या. अफताबच्या चेंडूवर हामिदने झेल घेत त्याला बाद केले. रॉस टेलरने 52 चेंडूंमध्ये 48 धावा करत विल्यमसनलाच्या सोबतीने 100 धावांचा टप्पा पार केला. न्यूझीलंडचा संघ 130 धावांवर असताना अफताबने टेलरला त्रिफळाचीत केले. विल्यमसनने 99 चेंडूंमध्ये 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 79 आणि टॉम लाथनने 18 चेंडूंमध्ये नाबाद 13 धावा करत न्यूझीलंडला विजयाच्या जवळ पोहोचवले.
यापूर्वी जेम्स निशाम आणि लॉकी फर्ग्यूसनच्या गोलंदाजीपुढे अफगिस्तानच्या संघाने लोटांगण घातले. निशामने 10 षटकांमध्ये 31 धावा देत 5 गडी बाद केले, तर फर्ग्यूसनने 9.1 षटकांमध्ये 37 धावा देऊन अफगाणिस्तानच्या 4 फलंदाजांना माघारी धाडले. सलामीवीर हजरातुल्लाह जजाई (34) आणि नूर अली जदरान(31) यांनी अफगाणिस्तानच्या संघाला उत्तम सुरूवात करून देत 10.5 षटकांमध्ये 66 धावांची भागिदारी केली. यानंतर 66 धावांवरच अफगाणिस्तानचे दोन्ही सलामीवीर आणि रहमत शाह यांना माघारी धाडले. हशमतुल्लाह शाहिदीने अर्धशतकी खेळी खेळत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळाली नाही. त्याने 99 चेंडूंमध्ये 59 धावांची खेळी केली. अखेर अफगाणिस्तानच्या संघाला 172 धावांपर्यंत मजल मारता आली.