दिवाळी आली असल्यानं नव्या पदार्थाविषयी सर्वानाच उत्सुकता असते. तेव्हा खेळांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी सादर करीत आहोत खमंग, सुग्रास आणि जागतिक कीर्तीचं असं ‘विश्वचषकाचं कडबोळं’. काही खेळांच्या मंडळींनी हा रुचकर पदार्थ तयार करून पाहिला आहे. तुमच्या खेळालासुद्धा तसाच वैश्विक उदाहरणार्थ विश्वचषक कबड्डीसारखा दर्जा मिळण्यासाठी ही कडबोळ्याची पाककृती आवश्य करून पाहा..
- साहित्य : एक विश्वचषक, जगातले किमान आठ ठिकाणचे संघ व मार्गदर्शक चमू (हा आकडा जितका अधिक, तितकं चांगलं), निरीक्षणासाठी पंचमंडळी, आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षक, अनुरूप आकाराचे एक मैदान, स्पध्रेचं व्यवस्थापन राखणारी कंपनी, निवासासाठी पंचतारांकित हॉटेल्स, चटपटीत सूत्रसंचालक आणि प्रसारमाध्यमं.
- कृती : सर्व साहित्य उपलब्ध असल्याची खात्री करून घेतल्यानंतर विश्वचषकाचं कडबोळं करण्यास प्रारंभ करा. विश्वचषकाचं आयोजन करायचं तर संघ लागणारच. तुमचा खेळ लोकप्रिय असेल, तर ते आपोआप येतील. अन्यथा तुम्हीच लक्ष घालून काही देशांमध्ये सांघिक जुळवाजुळव करा. देशात संघटना अस्तित्वात असो, अथवा नसो. खेळासाठी आवश्यक खेळाडूंची संख्या जुळली की तो देश विश्वचषकासाठी पात्र. मग यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जुळवाजुळव आली. पण अनुभवी प्रशासकांना हे शिवधनुष्य पेलणं, मुळीच कठीण नसतं. काही देशांसाठी खेळसुद्धा नवखा असू शकतो. मग कोणत्याही खेळात प्रावीण्य मिळवणारा खेळाडूच निवडल्यास त्याला तुमचा खेळ शिकवणं फारसं कठीण जात नाही. हे शिकवण्यासाठी काही दिवस खर्ची घातले तरी पुरेसे ठरतात. संघ तर तयार झाला, स्वाभाविकपणे मार्गदर्शकांचा चमूसुद्धा अशाच प्रकारे जुळवायचा. ज्यांच्या देशात मार्गदर्शकांची वानवा, त्यांना ती पुरवावी. ज्या देशात संघात स्थान मिळवण्यासाठी बरीच चढाओढ असेल, तिथे खेळाडूंनाच एक विशिष्ट आकडा ठरावीक व्यक्तीकडे मदतनिधी म्हणून देण्याचं समीकरण तयार करावं. तुमच्यासोबत विश्वचषक खेळण्यासाठी प्रतिस्पर्धी खेळाडू तरी हवेत, हेच या मागील सूत्र. तुम्ही विश्वचषक खेळलात की राज्य आणि केंद्र सरकार तुम्हाला कोटय़वधी रुपये देणार आणि दर्जेदार नोकरीसुद्धा मिळणार. त्यामुळे एक खेळाडू म्हणून तुम्ही अजिबात तोटय़ात नसणार, असंच हे गणित आखावं. अर्थात काही देशांमध्ये संघटनाच नसल्यामुळे विश्वचषक यशस्वी होण्यासाठी हाच खेळाडूंचा जमलेला पैसा तिथं गुंतवावा. जेणेकरून अर्थकारण जपलं जाईल.
- खेळाडू आणि संघांची जमवाजमव झाली, आता प्रत्यक्ष कृतीकडे वळू : जगाला हेवा वाटेल असा आकर्षक विश्वचषक आणि जिथे मैदान, निवास, आदी स्पर्धात्मक संयोजनाची अडचण सहजपणे सुटू शकेल, असं स्थळ निवडावं. पंतप्रधान, मुख्यमंत्री, प्रख्यात नेता, उद्योगपती अशा प्रकारच्या एखाद्या व्यक्तीचा वरदहस्त लाभल्यास हा सारा अर्थसंकल्प सांभाळणं अगदीच सोपं जातं.
- मग मैदानाची शानदार रचना, सुसज्ज प्रेक्षागृह, उद्घाटन, समारोप आणि दैनंदिन पारितोषिक वितरणासाठी सुप्रसिद्ध असामी हेसुद्धा विश्वचषकाच्या कडबोळ्यासाठी आवश्यक असतं. सामन्यांचं वेळापत्रक प्रेक्षकांचा स्पध्रेतील रस टिकवून ठेवणारं असावं. महत्त्वाच्या संघांच्या सामन्यांची रचना त्याच पद्धतीनं करून रंगत टिकवावी. हीच साहित्यकृती तंतोतंत केल्यास हे कडबोळं अत्यंत ‘फलदायी’ होऊ शकतं.
रुचकर होण्यासाठी महत्त्वाचे सल्ले :
- प्रेक्षकांनी तिकीट काढून येणं आणि स्टेडियम भरणं, हे सहजशक्य नसतं. त्यामुळे बऱ्याच सर्वसामान्य आणि काही असामान्य मंडळींना मोफत प्रवेशिका द्याव्यात.
- प्रेक्षागृह खेळाडू, संघ यांच्या नावांनी दणाणून सोडणारे क्रीडारसिक लागतात. त्यामुळे गरजेनुसार भाडोत्री चाहत्यांचीसुद्धा आयात करावी.
- केवळ मैदानापुरती स्पर्धा मर्यादित राहिल्यास आर्थिक फायदा होत नाही. त्यामुळे घरोघरी दिसू शकणाऱ्या एखाद्या क्रीडा वाहिनीशी या संदर्भातील करार केल्यास स्पध्रेचा प्रचार-प्रसार होऊ शकेल.
- दर्शकांच्या आवडत्या वेळेला म्हणजेच ‘प्राइम टाइम’ला सामने दूरचित्रवाणीवरून दाखवावेत.
- प्रेक्षकांनी सामने पाहावेत असे वाटत असेल, तर त्यात थरारसुद्धा हवा. एकतर्फी सामने कुणी का पाहावेत? मग टीआरपीची गणितं लक्षात घेऊन सामने अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार कसे होतील, सुरुवातीला एका संघाकडे झुकलेलं विजयाचं पारडं नंतर दुसऱ्या संघाकडे झुकलं जाईल, याची काळजी घ्यावी.
- अगदी गरज पडल्यास दिग्गज संघांच्या धक्कादायक पराभवांचंसुद्धा नाटय़मय, नेत्रदीपक दर्शन घडवावं.
- आगामी काळात तुमच्या खेळासाठी मोठय़ा प्रमाणात आर्थिक रसद मिळवू शकणाऱ्या संघाला उदयास आणल्यास ते खेळासाठी पूरक ठरू शकेल. हवं तर कोणत्याही अशा प्रकारच्या विश्वचषक स्पर्धाच्या आयोजकांना विचारा!!
प्रशांत केणी
