चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा , गोल केल्यानंतर आनंद व्यक्त करताना बार्सिलोनाचा लुईस सुआरेज
मेस्सीच्या अनुपस्थितीत सुआरेजने खिंड लढवली
सामन्याच्या अखेरच्या क्षणाला लुईस सुआरेजने गोल नोंदवून गतविजेत्या बार्सिलोना संघाला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेत बेयर लेव्हेर्कुसेनवर २-१ असा विजय मिळवून दिला. संघातील प्रमुख खेळाडू लिओनेल मेस्सी दुखापतीमुळे आठ आठवडय़ांच्या विश्रांतीवर असताना सुआरेजने जबाबदारीने खेळ करत खिंड लढवली आणि संघाला निसटता विजय मिळवून दिला.
किरीआकोस पॅपडोपॉलसने २२व्या मिनिटाला गोल करून पाहुण्या बेयर लेव्हेर्कुसेनला १-० अशा आघाडीवर आणले. मेस्सीच्या अनुपस्थितीत बार्सिलोनाला गोल खाते उघडण्यात पहिल्या सत्रात अपयश आले. दरम्यान अँड्रेस इनिएस्टाच्याही दुखापतीमुळे बार्सिलोनासमोरील अडचणी वाढल्या. सुआरेजने एकाकी खिंड लढवून संघासाठी विजयी गोल केला. तत्पूर्वी, सेर्गी रॉबेटरेने ८०व्या मिनिटाला गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला होता. त्यात दोन मिनिटांनंतर सुआरेजने भर टाकून बार्सिलोनाचा २-१ने विजय निश्चित केला.
या विजयामुळे ‘इ’ गटात बार्सिलोनाने अव्वल स्थान पटकावले असून त्यापाठोपाठ लेव्हेर्कुसेन आणि बॅटे यांचा क्रमांक येतो. ‘‘अखेपर्यंत आम्ही स्वत:वरील विश्वास कायम राखला. सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आले, परंतु आम्ही सामना जिंकला. आम्ही गतविजेते आहोत, हे पुन्हा एकदा दाखवले,’’ अशी प्रतिक्रिया सुआरेजने दिली.

इतर निकाल
आर्सेनल २ (थिओ व्ॉल्कॉट ३५ मि. व अ‍ॅलेक्सिस सांचेज ६५ मि.) पराभूत वि. ऑलिम्पिआकोस पिराउस ३ (एफ. पॅड्रो ३३ मि., डेव्हिड ऑस्पीना ४० मि. (स्वयंगोल), ए. फिनबॉगसन ६६ मि.)
पोटरे २ (अ‍ॅण्ड्रे ३९ मि. व मैकॉन ५२ मि.) विजयी वि. चेल्सी १ (विलियन ४५+ मि.).