इंग्लंडमध्ये २०१९ साली पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं होतं. यानंतर एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने धोनीला विश्रांती देत ऋषभ पंतला संधी दिली. मात्र या संधीचा पंतला फायदा उचलता आला नाही. यष्टींमागची ढिसाळ कामगिरी आणि बेजबाबदार फलंदाजी यामुळे पंत नेहमी टीकेचा धनी होत राहिला. २०२० वर्षात भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात संघ व्यवस्थापनाने पंतला विश्रांती देत लोकेश राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली. भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक दीप दासगुप्ताच्या मतेही टी-२० क्रिकेटमध्ये यष्टीरक्षणासाठी लोकेश राहुल हाच उत्तम पर्याय आहे.

“माझ्यामते टी-२० क्रिकेटमध्ये लोकेश राहुलने यष्टीरक्षण करायला हवं. राहुलच्या यष्टीरक्षणाचं तंत्र चांगलं आहे, तो उत्तम फलंदाजीही करतो. ऋषभ पंत हा तुमचा भविष्यातला उमेदवार आहे. त्या दृष्टीकोनातून पंतवर मेहनत घ्यायला हवी. पंतला स्थानिक क्रिकेटमध्ये अधिकाधीक खेळावं लागेल. जर तरीही पंत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाही तर मग ती खेदाची गोष्ट असेल.” दीप Sportskeeda संकेतस्थळाशी बोलत होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात फलंदाजीदरम्यान ऋषभ पंतच्या हेल्मेटला चेंडू लागून तो जखमी झाला होता, यावेळी पहिल्यांदा राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी आली होती.

सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती सावरल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू मैदानात कधी उतरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – तो मदत करतो पण पूर्णपणे नाही, धोनीबद्दल असं का बोलला असेल ऋषभ पंत?? जाणून घ्या…