भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून खेळला जात आहे. हा पहिला सामना नागपुरात खेळला जातोय. ऑस्ट्रेलिया संघाने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव १७७ धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून शानदार गोलंदाजी करताना रवींद्र जडेजाने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र मोहम्मद सिराज आणि शमीने भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोन धावांच्या स्कोअरवर कांगारू संघाचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर स्मिथ आणि लाबुशेन यांनी शानदार भागीदारी करत संघाला सांभाळले. उपाहारापर्यंत एकही विकेट पडू दिली नाही. पहिल्या सत्रात भारताने दोन विकेट्स मिळवल्या आणि ऑस्ट्रेलियाने ७६ धावा केल्या.

दुस-या सत्रात जडेजाने मार्नस लॅबुशेनला ४९ धावांवर बाद करून ८२ धावांची भागीदारी तोडली. त्याचबरोबर पुढच्याच चेंडूवर मॅट रेनशॉला बाद केले. काही वेळाने स्टीव्ह स्मिथही ३७ धावा करून जडेजाचा बळी ठरला. १०९ धावांवर पाच गडी गमावल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर आला. पीटर हँड्सकॉम्ब आणि अॅलेक्स कॅरी यांनी ५३ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन केले.

त्यानंतर अश्विनने कॅरीला त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ४५० व्या विकेट्सच्या रुपाने बाद केले. यानंतर त्याने पॅट कमिन्सला खातेही उघडू दिले नाही. चहापानापूर्वी जडेजाने टॉड मर्फीला बाद करून ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १७४/८ अशी कमी केली. अश्विन आणि जडेजाने या सत्रात एकूण सहा विकेट घेतल्या. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन संघ ९८ धावा करण्यात यशस्वी ठरला.

हेही वाचा – IND vs AUS 1st Test: मोहम्मद शमीने वॉर्नरला बोल्ड करत रचला इतिहास; दिग्गज गोलंदाजांच्या क्लबमध्ये झाला सामील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसऱ्या सत्रात जडेजाने पीटर हँड्सकॉम्बला ३१ धावांवर बाद केले आणि कसोटी क्रिकेटमध्ये ११व्यांदा एका डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला. यानंतर अश्विनने स्कॉट बोलंडला बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव १७७ धावांवर संपुष्टात आणला. आश्विनने ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर सिराज आणि शमीने प्रत्येकी एक विकेट्स घेतली.