महिला प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या सत्राला आजपासून सुरुवात होत आहे. हंगामातील पहिला सामना गुजरात जायंट्स (GG) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर होणार आहे. आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार होता. पण आता सामना सुरू होण्याच्या काही तास आधी बीसीसीआयने आपल्या वेळेत बदल केला आहे.

८ वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल

गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता रात्री ८ वाजता सुरू होईल. यासाठी नाणेफेक साडेसात वाजता होईल. बीसीसीआयने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. त्यापूर्वी उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. WPL २०२३ च्या पहिल्या सत्रात एकूण ५ संघ सहभागी होत आहेत, ज्यामध्ये पहिल्या सत्रात एकूण २२ सामने खेळवले जातील. त्याचबरोबर या मोसमाचा अंतिम सामना २६ मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.

लीग सुरू होण्यापूर्वी उद्घाटन सोहळ्याचा रंगारंग कार्यक्रम होणार आहे. उद्घाटन समारंभाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ४ वाजता प्रेक्षकांना प्रवेश मिळण्यास सुरुवात होईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:२५ वाजता सुरू होणारा भव्य उद्घाटन सोहळा ते पाहू शकतील. स्पर्धेच्या सुरुवातीला बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि क्रिती सॅनन या स्पर्धेला ग्लॅमर जोडण्यासाठी परफॉर्म करतील. यासोबतच गायक-गीतकार एपी धिल्लन त्यांचे काही म्युझिकल चार्टबस्टर स्टेजवर सादर करणार आहेत.

WPL कुठे पाहणार

तुम्हाला टीव्हीवर WPL २०२३ पाहायचे असल्यास, तुम्ही ते स्पोर्ट्स १८ नेटवर्कवर पाहू शकता. जर तुम्हाला महिला प्रीमियर लीग मोबाईल फोनवर बघायची असेल. त्यामुळे तुम्ही R Jio सिनेमावर त्याचा लाईव्ह स्ट्रीम पाहू शकता.

हेही वाचा: IND vs AUS: “गाबावर तर दोन दिवसात सामना संपला, किती पॉइटस् दिले?” इंदोर पिचवरून सुनील गावसकरांनी ICCवर डागली तोफ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही संघामध्ये जोरदार टक्कर अपेक्षित

हंगामातील पहिल्या सामन्यात अनेक मोठे खेळाडू खेळताना दिसणार आहेत. मुंबई इंडियन्सची मदार कर्णधार हरमनप्रीत कौरच्या हातात आहे. या संघात नतालिया सीव्हर, अमेलिया केर आणि हेली मॅथ्यूज सारखे मजबूत आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. टी२० विश्वचषक स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीकडे गुजरातचे नेतृत्व आहे. विश्वचषकामध्ये बॉल आणि बॅटने आश्चर्यकारक कामगिरी करणारी ऍशले गार्डनर देखील या संघाचा एक भाग आहे. संघाचे उपकर्णधारपद भारताच्या स्नेह राणाकडे आहे. याच कारणामुळे चाहत्यांना पहिल्याच सामन्यात धडाकेबाजपणा पाहायला मिळू शकतो.