भारताच्या अंडर-१९ संघाने ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघाला सलग दुसऱ्या युथ वनडे सामन्यात पराभवाचं पाणी पाजलं. भारताने दुसऱ्या युथ वनडेमध्ये ऑस्ट्रेलियावर ५१ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघाविरूद्ध तीन सामन्यांची युथ वनडे मालिका २-० च्या फरकाने आपल्या नावे केली आहे. या सामन्यात भारताकडून वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा आणि अभिज्ञान कोंडू यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली.

ऑस्ट्रेलियाकडून जेडन ड्रेपर याने शतक झळकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ड्रेपरने ६५ चेंडूत उत्कृष्ट शतकी खेळी केली, पण भारतीय गोलंदाजीसमोर तो संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. ड्रेपरच्या शतकानंतरही ऑस्ट्रेलियाचा संघ २४९ धावांवर सर्वबाद झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३०० धावा केल्या. ज्यामध्ये वैभव सूर्यवंशी ७० धावा, विहान मल्होत्रा ७० धावा तर अभिज्ञान कोंडू यांनी ७१ धावांच्या खेळी केल्या.

भारताने या सामन्यात नाणेफेक गमावली, पण त्यांना प्रथम फलंदाजी करण्याची संधी देण्यात मिळाली आणि आयुषच्या संघाने ४९.४ षटकांत ३०० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाला ४७.२ षटकांत केवळ २४९ धावा करता आल्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या ३०० धावांच्या भागीदारीत वैभव, विहान आणि अभिज्ञान यांच्या अर्धशतकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वैभवने ६८ चेंडूत ७० धावा केल्या, तर विहाननेही ७४ चेंडूत ७० धावा केल्या. त्यानंतर अभिज्ञानने ६४ चेंडूत ७१ धावांची जलद खेळी केली. दुसऱ्या सामन्यात कर्णधार आयुष खातंही उघडण्यात अपयशी ठरला. पण त्याने गोलंदाजीत तीन बळी घेत मोठी कामगिरी केली.

ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध १०९ धावांवर सहा विकेट्स गमावल्या. त्यानंतर जेडेन ड्रेपरने एका टोकाला उभं राहत १०७ धावा केल्या, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याने आर्यन शर्मासह सातव्या विकेटसाठी ७५ चेंडूत ११२ धावांची भागीदारी केली. त्याआधी, अॅलेक्स टर्नरने २४ धावा केल्या, तर संघाचा कर्णधार यश देशमुखने फक्त एक धाव केली. भारताकडून कर्णधार आयुष म्हात्रेने तीन, तर कनिष्क चौहानने दोन विकेट घेतल्या. किशन, अंबरिश, खिलान आणि विहान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.