Vaibhav Suryavanshi Record: आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय १९ वर्षांखालील संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. वनडे मालिकेचा थरार संपल्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये युथ कसोटी मालिकेचा थरार सुरू आहे. युथ वनडे मालिकेत आणि आयपीएल स्पर्धेत खेळताना त्याने शतक झळकावलं होतं. आता त्याने युथ कसोटी सामन्यात दमदार शतक झळकावलं आहे. स्फोट फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वैभवने कसोटी क्रिकेटमध्ये वनडे स्टाईल फलंदाजी केली. त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.
वैभवने पहिल्याच युथ कसोटी सामन्यात त्याने ८६ चेंडूंचा सामना करत ११३ धावांची दमदार शतकी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार आण ८ षटकार खेचले. टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना फलंदाज १३०-१४० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतात, अशीच काहीशी फलंदाजी वैभवने कसोटी क्रिकेटमध्ये केली आहे. या धावा त्याने १३१ च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. सलामीला फलंदाजीला आलेल्या आयुष आणि वैभवने पहिल्या विकेटसाठी ४७ धावा जोडल्या. आयुष २१ धावा करत माघारी परतला.
पण वैभवने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांविरूद्ध फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याचा डाव ११३ धावांवर आटोपला. पण या दमदार खेळीच्या बळावर त्याने भारतीय संघाला दमदार सुरूवात करून दिली. वैभवने ७८ चेंडूंचा सामना करत हे शतक झळकावलं आहे. यासह तो युथ कसोटीमध्ये फलंदाजी करताना १०० पेक्षा कमी चेंडूंचा सामना करताना २ शतकं झळकावणारा पहिलाच फलंदाज छरला आहे. या विक्रमात त्याने ब्रँडन मॅक्क्यूलमला मागे टाकलं आहे.
वैभवने आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व करताना गुजरात टायटन्सविरूद्ध दमदार शतक झळकावलं होतं. यासह युथ वनडे सामन्यातही त्याच्या नावे शतक झळकावण्याची नोंद आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या २४३ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना स्टीव्ह होगनने सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली. तर इतर कुठल्याही फलंदाजाला ५० धावांचा पल्ला देखील गाठता आलेला नाही. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना दिपेश देवेंद्रनने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर किशन कुमारने ३, अमोलजीत सिंग आणि खिलन पटेल यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाचा डाव स्वस्तात आटोपल्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. भारतीय संघाकडून वैभव सू्र्यवंशी आणि आयुष म्हात्रेची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी आली. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ४७ धावा जोडल्या. वैभव सूर्यवंशीने ११३ धावांची खेळी केली. तर आयुष म्हात्रेने २१ धावा केल्या. वेदांत त्रिवेदीने १४० धावांची खेळी केली. तर खिलन पटेल ४९ धावांवर माघारी परतला. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. यासह १८० हून अधिक धावांची आघाडी देखील घेतली आहे.