भारतीय संघ टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आव्हान कायम ठेवणार की स्पर्धेतील आव्हान आज संपुष्टात येणार याचा निकाल आज लागणार आहे. सलग दोन पराभव पत्करल्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ असंख्य आव्हानांना सामोरे जात आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरी गाठायची असल्यास भारताला सर्वप्रथम बुधवारी अफगाणिस्तानला पराभूत करावं लागणार आहे. अफगाणिस्तान विरुद्धचा हा सामना एकतर्फी होणार नाही हे अफगाणिस्तानची आणि भारताची आतापर्यंतची कामगिरी पाहिल्यावर निश्चित होत आहे. त्यामुळेच या सामन्याबद्दल फार उत्सुकता आहे. हा सामना नक्की कधी कुठे पाहता येणार, संघात काय बदल असू शकतात, आतापर्यंत या स्पर्धेत दोन्ही संघांनी काय कामगिरी केलीय हे जाणून घेऊयात…

भारताची स्थिती काय?
अबू धाबी येथे अव्वल-१२ फेरीतील लढतीत उभय संघ आमनेसामने येणार असून या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवण्यासाठी भारतीय खेळाडूंना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. भारताच्या संघनिवडीकडेही सर्वांचे लक्ष राहणार असून अफगाणिस्तानने यापूर्वी आपल्याला अनेकदा कडवी झुंज दिली असल्याने चाहत्यांना रंगतदार सामना पाहायला मिळेल.दुसऱ्या गटात समावेश असलेल्या भारताला सलामीला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने सहज धूळ चारली. त्यामुळे भारत सध्या गुणतालिकेत शून्य गुणासह पाचव्या स्थानी आहे.

अफगाणिस्तानची कामगिरी कशी?
मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने मात्र स्कॉटलंड, नामिबिया यांना धूळ चारून तूर्तास गटात दुसरे स्थान पटकावले आहे. अफगाणिस्तानला फक्त पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला. अफगाणिस्तानची फिरकी गोलंदाजी भारतीय फलंदाजांना रोखण्यास सक्षम असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे.

रोहित सलामीला; अश्विनला संधी
न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा डाव फसला. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध रोहित इशान किशनच्या साथीने सलामीला येण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादवच्या तंदुरुस्तीविषयी अद्याप संभ्रम कायम असल्याने के. एल. राहुल मधल्या फळीत खेळू शकतो. गोलंदाजीत मात्र वरुण चक्रवतीच्या जागी रविचंद्रन अश्विनचे संघातील स्थान पक्के मानले जात आहे. हार्दिक पंड्याने गेल्या सामन्यात गोलंदाजी केल्यामुळे त्याच्यावर संघ व्यवस्थापन पुन्हा विश्वास दर्शवण्याची शक्यता आहे.

सामना किती वाजता सुरु होणार?
भारताचा हा स्पर्धेतील तिसरा सामना असणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सात वाजता सुरु होईल. नाणेफेक सात वाजता होईल आणि साडेसातपासून प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल.

सामना कुठे खेळवला जाणार?
भारत आणि अफगाणिस्तानमधील हा पहिला सराव सामना अबू धाबीच्या मैदानात खेळवला जाणार आहे.

भारतीय चाहत्यांना कुठे हा सामना पाहता येईल?
हा सामना भारतीयांना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ एचडी हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ तमीळ, स्टार स्पोर्ट्स १ तेलगू आणि स्टार स्पोर्ट्स १ कन्नड या वहिन्यांवर लाइव्ह पाहता येईल.

भारताचा पुढील सराव सामना कधी?
भारताचा पुढील सामना दोन दिवसांनी म्हणजे पाच नोव्हेंबर रोजी स्कॉटलंडविरोधात तर आठ नोव्हेंबर रोजी नामिबियाविरोधात असणार आहे.

ऑलाइन कुठे पाहता येणार?
सराव सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवरुन केलं जाणार आहे. तसेच तुम्ही loksatta.com वरही या सामन्याचे अपडेट्स पाहू शकता.