पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवाला मागे टाकत टीम इंडियाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मेलबर्न कसोटीत दिमाखदार पुनरागमन केलं आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९५ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियाने रहाणेचं शतक आणि जाडेजाच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर पहिल्या डावात ३२६ धावांपर्यंत मजल मारली. अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जाडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी सामन्याला कलाटणी देणारी ठरली.

अजिंक्य रहाणेने दुसऱ्या दिवशी शतक झळकावल्यानंतर जाडेजानेही तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात आपलं अर्धशतक पूर्ण केलं. १५९ चेंडूत ३ चौकारांसह ५७ धावांची खेळी करत जाडेजाने कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात सातव्या क्रमांकावर येऊन ५० पेक्षा जास्त धावा करणारा जाडेजा दुसरा भारतीय फलंदाज ठरला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रविंद्र जाडेजाने आपली चमक दाखवत फलंदाजी असो अथवा गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण…प्रत्येक बाबतीत आपली चमक दाखवली आहे. ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी ही वाखणण्याजोगी आहे.

दरम्यान आपलं अर्धशतक पूर्ण करण्याच्या नादात जाडेजाने रहाणेला धावबाद करत भारताची जमलेली जोडी फोडण्यात कांगारुंना मदत केली. यानंतर जाडेजानं आपलं अर्धशतक आश्विनच्या साथीने पूर्ण केलं, मात्र यानंतर तो देखील मैदानावर फारकाळ तग धरु शकला नाही. मिचेल स्टार्कने जाडेजाला कमिन्सकरवी झेलबाद केलं.