सलग दोन टी-२० सामन्यांमध्ये बाजी मारुन मालिका खिशात घातलेल्या भारतीय संघाने अखेरच्या टी-२० सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा केला. परंतू नंतरच्या सत्रात मैदानावर भारतीय खेळाडूंनी काही सोपे झेल सोडले. ज्याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियन संघाने १८६ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने २ तर शार्दुल ठाकूर आणि टी. नटराजनने १-१ बळी घेतला.
टी. नटराजनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत आपला आयपीएलचा फॉर्म कायम ठेवत स्वतःची निवड सिद्ध केली आहे. भारताने या मालिकेत बुमराहला विश्रांती दिली आहे. परंतू नटराजनने बुमराहची उणीव भासू दिली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नटराजन आणि बुमराह यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या सामन्यांची आकडेवारी देखील एकदम मिळती-जुळती आहे.
Bumrah
1st ODI – 2 Wickets
1st T20I – 3 Wickets
2nd T20I – 2 Wickets
3rd T20I – 1 WicketNatarajan
1st ODI – 2 Wickets
1st T20I – 3 Wickets
2nd T20I – 2 Wickets
3rd T20I – 1 Wicket*#INDvsAUS— CricBeat (@Cric_beat) December 8, 2020
नाणेफेक जिंकत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत सुरुवातीच्या षटकांमध्ये भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर अंकुश लावला. पुनरागमन करणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच सुंदरच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर मॅथ्यू वेड आणि स्टिव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारुन देणार असं वाटत असतानाच सुंदरने स्टिव्ह स्मिथचा त्रिफळा उडवत भारताला दुसरं यश मिळवून दिलं, स्मिथने २४ धावा केल्या.
दुसऱ्या बाजूने मॅथ्यू वेडने आपली फटकेबाजी सुरु ठेवत अर्धशतक झळकावलं. मैदानात जम बसल्यानंतर भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत वेडने सिडनीच्या मैदानावर चौफर फटकेबाजी केली. ग्लेन मॅक्सवेलनेही आपल्याला मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत काही सुरेख फटके खेळले. वेड आणि मॅक्सवेल जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. दरम्यान शार्दुल ठाकूरने वेडला तर नटराजनने मॅक्सवेलला माघारी धाडत कांगारुंची जोडी फोडली.