भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात पहिल्यादा फलंदाजांनी यजमानांना अडचणीत आणले. त्यानंतर टीम इंडियाच्या आक्रमक गोलंदाजीने यजमान संघाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. ४०४ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ १५० धावांवर गारद झाला. गोलंदाजीत कुलदीप यादवने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने एकूण ५ फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याचबरोबर आपल्या नावावर अनेक विक्रमाची नोंद केली आहे.

कुलदीप यादवने २२ महिन्यांनंतर पुनरागमन करत आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांना चकित केले. पाच विकेट्सशिवाय त्याने फलंदाजीतही संघाला मोलाचे योगदान दिले. कुलदीपने ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या शानदार कामगिरीनंतर त्याने भारताचा माजी दिग्गज अनिल कुंबळेचा विक्रम मोडीत काढला आहे.

अश्विन कुंबळेचा विक्रम मोडीत –

कुलदीप यादवने बांगलादेशविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. यापूर्वी अश्विन आणि कुंबळे यांनी या संघाविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. अश्विनने २०१५ मध्ये या संघाविरुद्ध ८७ धावांत ५ बळी घेतले, तर कुंबळेने ४/५५ अशी आकडेवारी नोंदवली होती. आता दुसऱ्या डावात कुलदीपने ४० धावा देताना पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात कुलदीप यादवचे २२ महिन्यांनंतर पुनरागमन झाले आहे. यापूर्वी तो फेब्रुवारी २०२१ मध्ये लाल चेंडू क्रिकेट खेळला होता. त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत तिसऱ्यांदा पाच विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघाविरुद्ध हा पराक्रम केला आहे.

हेही वाचा – Video: अर्जुन तेंडुलकरसोबत योगराज सिंग यांनी धरला ठेका, व्हिडिओ होतोय व्हायरल

भारताचा सातवा गोलंदाज –

बांगलादेशविरुद्ध कसोटीच्या एका पाच आणि त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये कुलदीप यादव सातवा गोलंदाज आहे. या यादीत भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज इरफान पठान सर्वात तो पुढे आहे. त्याने तीन वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर झहीर खाने हा कारनामा दोन वेळा केला आहे. त्याचबरोबर आर. आश्विन, सुनील जोशी, इशांत शर्मा, उमेश यादव आणि कुलदीप यादवने एकदा हा कारनामा केला आहे.

हेही वाचा – IND vs BAN 1st Test: कुलदीपने चट्टोग्राममध्ये फडकवला आपल्या नावाचा झेंडा; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच गोलंदाज

पहिलाच भारतीय गोलंदाज –

चट्टोग्रामच्या मैदानावर पाच विकेट्स घेणारा कुलदीप यादव हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याने १६ षटके गोलंदाजी करताना ४० धावा दिल्या आणि पाच विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या या स्पेलमध्ये मुशफिकूर रहीम, शाकिब अल हसन, नुरुल हसन, तैजुल इस्लाम आणि इबादत हुसेन या तंबूत पाठवले. याचबरोबर तो भारतासाठी चट्टोग्रामच्या मैदानावर पाच विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.