दुसऱ्या कसोटीत भारत आणि बांगलादेश यांच्यात निकराची लढत झाली. सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी आपापल्या परीने शर्थीचे प्रयत्न केले. पण टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर आर अश्विनने शेवटी सामन्याची दिशा आणि स्थिती पूर्णपणे बदलून टाकली. त्यामुळे भारतीय संघाने ३ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्याचा हिरो ठरलेल्या अश्विनने ट्विटरवर ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराची पोस्ट शेअर केली. या पोस्टने बांगलादेशी चाहत्यांच्या जखमेवर पूरेपुर मीठ चोळण्याचे काम केले.

वास्तविक, अश्विनला त्याच्या सामनाविजेत्या कामगिरीमुळे सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. ही गोष्ट यजमान संघाच्या चाहत्यांना रुचली नाही. त्यामुळे एका चाहत्याने अश्विनला ट्विटरवर ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण फिरकी मास्टरने एका फटक्यात त्याची फजिती करताना त्याची बोलतीच बंद केली. निबराज रमजान नावाच्या एका बांगलादेशी ट्विटर वापरकर्त्याने करताना लिहिले की, ”झेल सोडणाऱ्या मोमिनुल हकला तुम्ही सामनावीराचा पुरस्कार द्यायला हवा होता. त्याने हा झेल घेतला असता तर भारतीय संघ ८९ धावांवर आटोपला असता.” यानंतर फिरकी मास्टरने त्याला खरमरीत उत्तर दिले.

त्याला उत्तर देताना अश्विनने लिहिले, ”अरे नाही! मला वाटले मी तुला ब्लॉक केले आहे. माफ कर ते दुसरे त्याचे नाव काय आहे? होय डॅनियल अलेक्झांडर. जर भारताने क्रिकेट खेळले नसते तर तुम्ही दोघांनी काय केले असते याची कल्पना करा.” खरे तर डॅनियल अलेक्झांडर नावाचा युजर भारताला अनेकदा ट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो.

हेही वाचा – IND vs BAN: विराट कोहलीचा दिलदारपणा! टीम इंडियाच्या ‘प्रतिस्पर्धी’ खेळाडूला दिली खास भेट, जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने १०० धावांत गमावल्या होत्या ७ विकेट्स –

चौथ्या दिवशी टीम इंडिया खूपच कठीण स्थितीत होती. सामना पूर्णपणे बांगलादेशच्या ताब्यात होता. पण सामन्याच्या निर्णायक वळणावर श्रेयस अय्यर आणि आर अश्विन यांच्यात मौल्यवान भागीदारी पाहायला मिळाली. अश्विनने या सामन्यात पाच विकेट घेणारा बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू मेहंदी हसनलाही सोडले नाही. त्याने हसनच्या षटकात १६ धावा करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. अश्विनने ६२ चेंडूत ४२ धावांची नाबाद खेळी केली, तर अय्यरनेही २९ धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाने मालिका २-० ने आपल्या नावावर केली.