‘Practice makes ‘Hitman’ perfect!’, हा व्हिडीओ एकदा पहाच

रोहितने केलेल्या सरावाचा झाला फायदा

बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद ४९३ धावांपर्यंत मजल मारली आणि पहिला डाव घोषित केला. बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर आटोपला. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्यांची खराब कामगिरी सुरूच राहिली. शदमन इस्लाम, इमरूल कयास, कर्णधार मोमिनुल हक, मोहम्मद मिथून आणि मोहम्मदुल्लाह हे सारेच स्वस्तात माघारी परतले. या सामन्यात रोहित शर्माच्या बाबतीत एक भन्नाट किस्सा घडला.

बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुश्फिकूर रहीम फलंदाजी करताना शमीच्या गोलंदाजीवर रोहितने त्याचा झेल स्लिपमध्ये सोडला. त्यानंतर उपहाराच्या विश्रांती दरम्यान रोहितला स्लिपमध्ये कॅच घेण्याचा सराव देण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे त्यानंतर शमीच्याच गोलंदाजीवर महम्मदुल्लाहचा झेल पुन्हा रोहितच्या दिशेने उडाला. यावेळी रोहितने कोणतीही चूक न करता झेल टिपला आणि practice makes man perfect ही उक्ती खरी करून दाखवली.

पहा व्हिडीओ –

दरम्यान, दुसऱ्या दिवशी मयांक अग्रवालचे अडीचशतक अवघ्या काही धावांनी हुकले. १ बाद ८६ या धावसंख्येवरून आज भारताने डावाला सुरूवात केली होती. त्यानंतर मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जाडेजा यांच्या दमदार खेळीच्या बळावर भारताने ४९३ धावा केल्या आणि दिवसाचा खेळ संपल्यानंतर कर्णधार विराटने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशपुढे ३४३ धावांचे आव्हान ठेवले.

त्याआधी, बांगलादेशच्या पहिल्या डावात शदमन इस्लाम, इमरूल कयास आणि मोहम्मद मिथून हे तिघेही स्वस्तात बाद झाले. पण दुसऱ्या सत्रात बांगलादेशकडून चांगली झुंज पहायला मिळाली. कर्णधार मोमिनुल हक आणि अनुभवी मुश्फिकूर रहीम या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदीरी केली. अखेर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने ही जोडी फोडली. मोमिनुलने चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला पण चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. त्यामुळे ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा करून मोमिनुल बाद झाला. मोमिनुलने ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा केल्या. त्यानंतर अनुभवी मुश्फिकूर रहीम शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने १०५ चेंडूत ४३ धावा केल्या, पण बाकी फलंदाजांना खेळपट्टीवर दीर्घ काळ तग धरता आलं नाही. लिटन दासने २१ धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही बांगलादेशचा डाव १५० धावांत आटोपला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ind vs ban india vs bangladesh hitman rohit sharma drop catch does practice later take catch video vjb