बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद ४९३ धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर आटोपला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मयांक अग्रवालचे अडीचशतक अवघ्या काही धावांनी हुकले. १ बाद ८६ या धावसंख्येवरून आज भारताने डावाला सुरूवात केली होती. त्यानंतर मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जाडेजा यांच्या दमदार खेळीच्या बळावर भारताने ४९३ धावा केल्या.

दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली. पण त्यानंतर पुजारा ५४ धावांवर बाद झाला. पाठोपाठ विराटही शून्यावर माघारी परतला. पण रहाणेच्या साथीने अग्रवालने डाव सावरला. रहाणे ८६ धावांवर बाद झाला, पण अग्रवालने दमदार द्विशतक ठोकले. मात्र द्विशतकानंतर तुफान फटकेबाजीच्या प्रयत्नात तो २४३ धावांवर बाद झाला. त्याने चौकार मारत १५० तर षटकार मारत द्विशतक ठोकले. तशाच प्रकारचा मोठा फटका मारून २५० धावा करण्याचा त्याचा विचार होता, पण हवेत खेळलेल्या मोठ्या फटक्याने त्याचा घात केला. सीमारेषेवर त्याचा झेल घेतला.

हा पहा व्हिडीओ –

मयांक बाद झाल्यावर जाडेजाने तुफान फटकेबाजी केली. सध्या जाडेजा ६० तर उमेश यादव २५ धावांवर खेळत आहे. पहिल्या दिवशी भारताच्या डावात सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला होता. बांगलादेशकडून अबू जायेदने ४ तर मेहिदी हसन मिराज आणि एबादत यांनी १-१ गडी बाद केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याआधी, बांगलादेशच्या पहिल्या डावात शदमन इस्लाम, इमरूल कयास आणि मोहम्मद मिथून हे तिघेही स्वस्तात बाद झाले. पण दुसऱ्या सत्रात बांगलादेशकडून चांगली झुंज पहायला मिळाली. कर्णधार मोमिनुल हक आणि अनुभवी मुश्फिकूर रहीम या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदीरी केली. अखेर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने ही जोडी फोडली. मोमिनुलने चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला पण चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. त्यामुळे ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा करून मोमिनुल बाद झाला. मोमिनुलने ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा केल्या. त्यानंतर अनुभवी मुश्फिकूर रहीम शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने १०५ चेंडूत ४३ धावा केल्या, पण बाकी फलंदाजांना खेळपट्टीवर दीर्घ काळ तग धरता आलं नाही. लिटन दासने २१ धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही बांगलादेशचा डाव १५० धावांत आटोपला.