कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी भारतीय संघाने सामन्यात बाजी मारली. टी २० मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने २-० असे निर्विवाद वर्चस्व राखत ICC च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. भारताने बांगलादेशवर १ डाव आणि ४६ धावांनी मात केली. पहिला डाव ३४७ धावांवर घोषित केल्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव भारताने १९५ धावांवर संपला. त्यामुळे भारताने दिमाखदार विजय साकारला.
बांगलादेशच्या संघाला आधी टी २० मालिका २-१ ने गमवावी लागली, नंतर कसोटी मालिकेत २-० ने व्हाईटवॉश मिळाला. त्यामुळे बांगलादेशसाठी हा दौरा फारसा चांगला ठरला नाही. त्यातच बांगलादेशच्या एका खेळाडूलाही दणका बसला. बांगलादेशच्या संघासोबत भारतात आलेला फलंदाज हसन सैफ याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. बांगलादेशच्या संघात त्याला बॅक-अप फलंदाज म्हणून ठेवण्यात आले होते.
संघासोबत त्याने भारतात वास्तव्य केले. पण भारतातून पुन्हा मायदेशी जाताना त्याला विमानतळावर अडवण्यात आले. त्याचा सहा महिन्यांचा व्हिसाचा कालावधी संपला असल्यामुळे त्याला रोखण्यात आले. त्याच्या व्हिसाचा कालावधी संपला असल्याचे त्याला विमानतळावर समजले. त्यामुळे त्याला २१ हजार ६०० रूपये दंड भरावा लागला. त्याच्या व्हिसाचा कालापधी संपला होता हे त्याला विमानतळावर समजले. नव्या नियमानुसार त्याला दंड भरल्याशिवाय विमानप्रवास करणे शक्य नव्हते. त्याने दंड भरल्यानंतर त्याच्या व्हिसाचा कालावधी वाढवण्यात आला आणि त्याला भारतातून उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली, अशी माहिती बांगलादेशचे उप-उच्चायुक्त तौसिफ यांनी दिली.
हसन सैफ
दरम्यान, भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव केवळ १०६ धावांवर आटोपला. यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली याने दमदार शतक ठोकत भारताला भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बांगलादेशच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात देखील खराब कामगिरी केली. त्यांचा दुसरा डाव १९५ धावांत आटोपला.