बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १३० धावांनी विजय मिळवला. मोहम्मद शमीचे चार बळी आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली साथ याच्या बळावर भारताला दणदणीत विजय मिळवणे शक्य झाले. मयांक अग्रवाल याने केलेल्या द्विशतकामुळे भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव मात्र अवघ्या २१३ धावांवर आटोपला. द्विशतक ठोकणाऱ्या मयांक अग्रवालला सामनावीर जाहीर करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाचा हा सलग सहावा कसोटी विजय ठरला. याचसोबत भारताने सलग वेळा  विंडीजमध्ये झालेले २ सामने भारताने जिंकले. त्या पाठोपाठ दक्षिण अफ्रिकेविरूद्ध भारताने ३ सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली. त्यासोबत भारतीय संघाने आज बांगलादेशला पहिल्या कसोटीत पराभूत करत विजेतेपदाचा षटकार लगावला आणि स्वत:च्याच विक्रमाशी बरोबरी केली. या आधी २०१३ मध्ये भारताने सर्वाधिक सलग सहा कसोटी सामने जिंकले होते.

सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताने डाव घोषित केल्यानंतर तिसऱ्या दिवशी बांगलादेशच्या संघाचा दुसरा डाव सुरू झाला. ३४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची दुसऱ्या डावातही सुरूवात खराब झाली. उपहारापर्यंतच त्यांनी ६० धावांत बांगलादेशने ४ गडी गमावले. त्यानंतरही बांगलादेशला सावरता आले नाही. शदमन इस्लाम, इमरूल कयास, कर्णधार मोमिनुल हक, मोहम्मद मिथून, मोहम्मदुल्लाह, ताजीउल ईस्लाम आणि एबादत हुसेन या साऱ्यांनी निराशा केली. मुश्फिकूर रहीम (४३), मेहिदी हसन (३८) आणि लिटन दास (३५) यांनी काही काळ संघर्ष केला. पण ते संघाचा पराभव टाळू शकले नाही. शमीने ४, अश्विनने ३, उमेशने २ तर इशांतने १ गडी बाद केला.

त्याआधी भारताच्या डावात सलामीवीर रोहित पहिल्याच दिवशी स्वस्तात बाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली. पण त्यानंतर पुजारा ५४ धावांवर बाद झाला. पाठोपाठ विराटही शून्यावर माघारी परतला. पण रहाणेच्या साथीने अग्रवालने डाव सावरला. रहाणे ८६ धावांवर बाद झाला, पण अग्रवालने दमदार द्विशतक ठोकले. मात्र द्विशतकानंतर तुफान फटकेबाजीच्या प्रयत्नात तो २४३ धावांवर बाद झाला.

Video : ‘या’ फटक्याने केला मयांकचा घात

मयांक बाद झाल्यावर जाडेजाने तुफान फटकेबाजी केली. बांगलादेशकडून अबू जायेदने ४ तर मेहिदी हसन मिराज आणि एबादत यांनी १-१ गडी बाद केला.

Video : “भावा… तू २०० कर!”; विराटच्या मेसेजला मयंकने दिलं ‘हे’ उत्तर

त्याआधी, बांगलादेशच्या पहिल्या डावात शदमन इस्लाम, इमरूल कयास आणि मोहम्मद मिथून हे तिघेही स्वस्तात बाद झाले. पण दुसऱ्या सत्रात बांगलादेशकडून चांगली झुंज पहायला मिळाली. कर्णधार मोमिनुल हक आणि अनुभवी मुश्फिकूर रहीम या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदीरी केली. अखेर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने ही जोडी फोडली. मोमिनुलने चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला पण चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. त्यामुळे ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा करून मोमिनुल बाद झाला. मोमिनुलने ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा केल्या. त्यानंतर अनुभवी मुश्फिकूर रहीम शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने १०५ चेंडूत ४३ धावा केल्या, पण बाकी फलंदाजांना खेळपट्टीवर दीर्घ काळ तग धरता आलं नाही. लिटन दासने २१ धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही बांगलादेशचा डाव १५० धावांत आटोपला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban india vs bangladesh team india won 6th consecutive test match and equals their best win sequence vjb
First published on: 16-11-2019 at 17:05 IST