IND vs ENG 3rd test Day 2 Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे भारतीय संघ गोलंदाजी करत आहे. पहिल्या डावात इंग्लंडने ३८७ धावा केल्या, तर टीम इंडियाही पहिल्या डावात ३८७ धावा करत सर्वबाद झाली. यासह पहिल्या डावातील दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीत आहे. भारताने चौथ्या दिवशी इंग्लंडला १९२ धावांवर सर्वबाद केलं. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवशी ४ विकेट्स गमावत ८ धावा केल्या आहेत. तर आता भारताला विजयासाठी १३५ धावांची गरज आहे.
भारताचा नाईट वॉचमन क्लीन बोल्ड
शुबमन गिलची विकेट गमावल्यानंतर काही मिनिटांचा सामना शिल्लक होता, यादरम्यान भारताने नाईट वॉचमन म्हणून आकाशदीपला फलंदाजीला पाठवलं. पण आखाशदीपने दिवसाच्या अखेरच्या षटकात स्टोक्सच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला.
शुबमन गिल पायचीत
ब्रायडन कार्सने कमालीची स्पेल टाकत संघाला दुसरी विकेट मिळवून दिली. शुबमन गिलला पायचीत करत मोठी विकेट मिळवून दिली आहे. गिलने रिव्ह्यू घेतला आणि बॅटला चेंडू लागला नसल्याने बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू थेट स्टम्पवर आदळल्याचं दिसलं आणि गिलला बाद घोषित केलं. भारताने १५ षटकांत ३ बाद ५३ धावा केल्या आहेत.
इंग्लंडच्या खात्यात दुसरी विकेट
केएल राहुल आणि करूण नायरने संघाचा डाव सावरल्यानंतर इंग्लंडने ही भागीदारी तोडत भारताला दुसरा धक्का दिला आहे. करूण नायरने चांगल्या सुरूवातीसह आणि कमालीच्या कव्हर ड्राईव्ह खेळत त्याचा डाव साकारत होता. पण कार्सचा चेंडू सोडायला गेला आणि चेंडू येऊन पॅडवर आदळला आणि पायचीत होत माघारी परतला.
भारताला पहिला धक्का
इंग्लंडने दिलेल्या १९३ धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. जोफ्रा आर्चरने टाकलेल्या चेंडूवर काय फटका खेळू हे ठरवण्याआधीच बॅटची कड घेत चेंडू हवेत उंच उडाला आणि जेमी स्मिथने सोपा झेल टिपला. भारताला ५ धावांवर पहिला धक्का बसला आहे.
भारतासमोर लॉर्ड्स कसोटी जिंकण्यासाठी किती धावांचं लक्ष्य
वॉशिंग्टन सुंदरने शोएब बशीरला क्लीन बोल्ड करत इंग्लंडला ऑलआऊट केलं. वॉशिंग्टन सुंदरने भेदक गोलंदाजी करत इंग्लंडच्या ४ फलंदाजांना बाद केलं. यासह इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात १९२ धावांवर सर्वबाद झाला आहे. यजमान संघाने भारताला लॉर्ड्स कसोटी जिंकण्यासाठी १९३ धावांच आव्हान दिलं आहे.
दोन षटकांत दोन विकेट अन् वोक्सचा बोल्ड
इंग्लंडच्या डावातील ५६ आणि ५७व्या षटकात भारताला लागोपाठ दोन विकेट मिळाले. ५६व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने बेन स्टोक्सला क्लीन बोल्ड केलं. तर बुमराहने पुढील षटकातील पहिल्याच चेंडूवर ब्रायडन कार्सला त्रिफळाचीत करत दुसऱ्या डावातील पहिली विकेट मिळाली. यासह इंग्लंडने ८ विकेट्स गमावले आहेत. यानंतर बुमराहने पुढच्या षटकात ख्रिस वोक्सला क्लीन बोल्ड करत नववी विकेट मिळवली.
टीब्रेक
इंग्लंड संघाने दुसऱ्या सत्रात २७ षटकांत २ विकेट्स गमावत ७७ धावा केल्या. यासह इंग्लंडच्या संघाने टीब्रेकपर्यंत एकूण ६ बाद १७५ धावा केल्या आहेत. भारताकडून मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी २-२ विकेट्स घेतले तर नितीश रेड्डी, आकाशदीप यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
जेमी स्मिथ त्रिफळाचित
जो रूटनंतर वॉशिंग्टन सुंदरने जेमी स्मिथला क्लीन बोल्ड केलं आहे. जेमी स्मिथने संपूर्ण मालिकेत आक्रमक फलंदाजी करत भारतीय संघाला फार त्रास दिला आहे. पण आता दुसऱ्या डावात सुंदरने स्मिथला मैदानावर टिकू दिलं नाही. इंग्लंडचा निम्मा संघ यासह तंबूत परतला आहे.
जो रूट क्लीन बोल्ड
इंग्लंडचा सर्वात अनुभवी फलंदाज जो रूट वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला आहे. जो रूट गुडघ्यावर बसून फटका खेळायला गेला आणि चेंडू जाऊन स्टम्पवर आदळला. यासह भारताला सेट झालेल्या रूटची विकेट मिळाली. तर इंग्लंडने आतापर्यंत ५ बाद १५८ धावा केल्या आहेत.
इंग्लंडने लंचब्रेकपर्यंत किती धावा केल्या?
इंग्लंड संघाने लंचब्रेकपर्यंत ४ बाद ९८ धावा केल्या आहेत. भारताच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात भेदक गोलंदाजी करत इंग्लिश संघाला धावा करण्याची फारशी संधी दिली नाही. तर सिराज, आकाशदीप आणि नितीश रेड्डी यांनी कमालीच्या गोलंदाजीच्या जोरावर विकेट्स घेतले.
आकाशदीपच्या खात्यात मोठी विकेट
पहिल्या डावात एकही विकेट न मिळवल्याने आकाशदीप चर्चेचा विषय ठरला होता. पण दुसऱ्या डावात त्याने २२व्या षटकात हॅरी ब्रूकला क्लीन बोल्ड करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. ब्रूकने आकाशच्या आधीच्या षटकात दोन चौकार आणि १ षटकार लगावत धुलाई केली होती. आकाशने पुढील षटकात बोल्ड करत घेतला बदला.
नितीश रेड्डीने क्रॉलीला केलं बाद
नितीश रेड्डीने १६व्या षटकात जॅक क्रॉलीला झेलबाद करत संघाला तिसरी विकेट मिळवून दिली. भारताच्या सर्व गोलंदाजांनी चौथ्या दिवशी कमालीची गोलंदाजी केली आहे. नितीशच्या गोलंदाजीवर गलीमध्ये यशस्वी जैस्वालने शानदार झेल टिपला.
सिराजने मिळवून दिली दुसरी विकेट
मोहम्मद सिराजने डकेटनंतर ऑली पोपला बाद करत संघाला विकेट मिळवून दिली आहे. सिराजने १२व्या षटकातील अखेरचा टाकलेला चेंडू पोपच्या पॅडवर जाऊन आदळला आणि संघाने विकेटची अपील केली. पण मैदानावरील पंचांनी बाद दिलं नाही, यानंतर गिलशी चर्चा करून सिराजने रिव्ह्यू घेतला, ज्याचा निर्णय भारताच्या बाजूने लागला आणि संघाला विकेट मिळाली.
भारताच्या खात्यात पहिली विकेट
भारताला चौथ्या दिवशी सुरूवातीला पहिली विकेट मिळाली आहे. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर आक्रमक फलंदाजी करणाऱ्या डकेटला सिराजने जसप्रीत बुमराहकरवी झेलबाद केलं आहे. यासह डकेट १२ धावा करत बाद झाला.
बुमराहच्या षटकात क्रॉलीच्या हातावर आदळला चेंडू
भारतीय खेळाडूंनी चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यापासून जॅक क्रॉलीला पूर्णपणे घेरून ठेवलं आहे आणि सातत्याने मोठमोठ्याने बोलत हुर्यो उडवली जात आहे. क्रॉलीवर देखील याचा दवाब दिसून येत आहे आणि त्याला अद्याप चौथ्या दिवशी एकही धाव काढता आलेली नाही. दुसऱ्याच षटकात बुमराह गोलंदाजीला आला आणि त्या षटकातील अखेरचा चेंडू क्रॉलीच्या हातावर जाऊन आदळला की त्याच्या हातातून बॅट निसटली. थोडक्यासाठी बुमराह झेल टिपण्यासाठी चुकला.
तिसऱ्या दिवशी अखेरच्या षटकात मोठा ड्रामा
भारत आणि इंग्लंड लॉर्ड्स कसोटीतील तिसऱ्या दिवशी अखेरच्या षटकात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. भारतीय संघ तिसऱ्या दिवसाचा खेळ संपायला अवघी काही मिनिटं शिल्लक असताना सर्वबाद झाला. त्यामुळे इंग्लंडला फलंदाजीला उतरावं लागलं. पण इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉली १ षटकं व्हावं यासाठी वेळ घालवताना दिसला. ज्यामुळे शुबमन गिलसह भारताचे सर्व खेळाडू चांगलेच संतापलेले दिसले. गिल-क्रॉली-डकेट यांच्यात मोठा वादावादी झाली होती, ज्यामुळे मैदानावर फार तणावाचं वातावरण होतं.