India vs England 4th Test: मँचेस्टरमध्ये भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये चौथ्या कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्याला २३ जुलैपासून सुरूवात होणार आहे. मालिकेच्या दृष्टीने हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना गमावला, तर भारतीय संघ मालिका जिंकणार नाही. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात पूर्ण ताकदीने उतरू शकतो. चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली,त्यावेळीच जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबत मोठी अपडेट देण्यात आली होती. कामाच्या ताणाचे व्यवस्थापन करण्यासाठी तो मालिकेतील ५ पैकी ३ सामने खेळणार, तर २ सामन्यात त्याला विश्रांती दिली जाणार असल्याचं आधीपासून ठरलं आहे. त्यामुळे पहिला सामना खेळल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या सामन्यात त्याने पुनरागमन केलं. आता चौथ्या सामन्यात विश्रांती करून तो पाचव्या कसोटीत पुनरागमन करणार, अशी चर्चा रंगली होती. पण पुढील सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे तो चौथ्या सामन्यात खेळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
या गोलंदाजाचं पदार्पण होणार?
या सामन्यासाठी एके ४७ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २४ वर्षीय अंशुल कंबोजचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याला मँचेस्टर कसोटीत पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आकाशदीपला चौथ्या कसोटीत विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी अंशुल कंबोजला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळणार आहे. आकाशदीपने मालिकेतील तिसऱ्या सामन्यात महत्वाचे गडी बाद करून दिले होते. मात्र त्याला दुखापतीमुळे मैदान सोडून जावं लागलं होतं. त्यानंतर पुन्हा तो मैदानात परतला होता. मात्र, त्याची दुखापत पाहता त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळायला मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
अर्शदीप सिंग बाहेर
या निर्णायक सामन्याआधी भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग दुखापतीमुळे चौथ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. या सामन्याआधी सराव करत असताना साई सुदर्शनने मारलेला चेंडू हा अर्शदीपच्या हाताला लागला. त्यामुळे हाताला टाके लावण्यात आले आहेत. याच कारणास्तव तो चौथ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याचा बदली खेळाडू म्हणून अंशुल कंबोजला संघात स्थान दिलं गेलं आहे.