Sarfaraz Khan’s fans angry with Virender Sehwag’s post : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेलने चमकदार कामगिरी केली. त्याने इंग्लिश संघाविरुद्ध पहिल्या डावात ९० धावांची दमदार खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढले. ध्रुवचे महत्त्वपूर्ण योगदान असूनही, क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले नाही, ज्यामुळे सेहवाग नाराज झाला आहे. यानंतर सेहवागने एक्सवर जुरेलचे कौतुक करण्यासाठी पोस्ट केली असून या पोस्टवरुन सर्फराझचे चाहते नाराज झाले आहेत.
वास्तविक, टीम इंडियाने पहिल्या डावात १७७ धावांमध्ये सात विकेट गमावल्या होत्या, परंतु ध्रुव जुरेलने कुलदीप यादवसह भागीदारी करत भारताची धावसंख्या ३०० धावांच्या पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. यानंतर माजी सलामीवीराने त्याच्या या कामगिरीचे कौतुक केले. याशिवाय जुरेल आणि इतर खेळाडूंचे कौतुक करताना दुटप्पी वृत्ती स्वीकारणाऱ्या लोकांच्या वर्गाला सुनावले.
सेहवागच्या पोस्टमुळे सर्फराझचे चाहते नाराज –
सेहवागने ज्युरेलचे कौतुक करणारी पोस्ट केली आणि त्याला सन्मान आणि प्रसिद्धी देण्याची मागणी केली. सेहवागने लिहिले की, “कोणतीही मीडिया प्रसिद्धी नाही, नाटक नाही, कठीण परिस्थितीत शांत राहून फक्त मजबूत कौशल्ये आणि उत्तम स्वभाव दाखवला. त्याबद्दल ध्रुव जुरेलचे खूप अभिनंदन.”
सेहवागचे ही पोस्ट सर्फराझ खानच्या चाहत्यांना आवडली नाही. त्यांनी दिग्गज क्रिकेटपटूला यावरुन ट्रोल करण्यास सुरुवात केली. वास्तविक, सर्फराझने पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतकी खेळी केली होती. या काळात मीडियामध्ये त्याचे खूप कौतुक झाले. या अनुभवी क्रिकेटपटूला युवा फलंदाजाची स्तुती पचवता आली नाही, असे चाहत्यांचे मत आहे.
सोशल मीडियावर झालेल्या गदारोळानंतर सेहवागने आणखी एका ट्विटमध्ये स्पष्ट केले की, त्याने कोणालाही कमी लेखण्यासाठी किंवा अपमान करण्यासाठी पोस्ट केली नाही. सन्मान आणि प्रसिद्धी ही कामगिरीवर आधारित असावी असे त्याला वाटते. त्याने लिहिले, “मला कोणालाही कमी लेखायचे नाही, परंतु सन्मान आणि प्रसिद्धी कामगिरीच्या जोरावर मिळाली पाहिजे आणि सर्वांसाठी समान असली पाहिजे. काहींनी चमकदार गोलंदाजी केली, काहींनी असाधारण फलंदाजी केली. परंतु त्यांना योग्य सन्मान मिळाला नाही, जो त्यांना मिळायला हवा होता. आकाश दीपची कामगिरी उत्कृष्ट होती. यशस्वी संपूर्णपणे मालिकेत जबरदस्त कामगिरी राहिली आहे. राजकोटमध्ये सर्फराझ आणि ध्रुव जुरेल यांनी त्यांच्या सर्व संधींमध्ये चमकदार कामगिरी केली. त्यामुळे प्रसिद्धी सर्वांना समान मिळाली पाहिजे.”