IND vs ENG 5th Test Day 4 Live Updates in Marathi: भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील अखेरचा कसोटी सामना शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोच आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताने प्रथम फलंदाजी करताना २२४ धावा केल्या. तर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २४७ धावांवर सर्वबाद झाला. यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात शानदार फटकेबाजी करत ३९६ धावा करत इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान दिलं आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला
भारत आणि इंग्लंड ओव्हल कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ लवकर संपवण्यात आला आहे. खराब सूर्यप्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला, त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. मैदान यामुळे खूप ओलं झालं आणि वेळ पाहता सामना पुन्हा सुरू होण्यासाठी वेळ लागला असता. त्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपवण्यात आला आहे. आता पाचव्या दिवशी या सामन्याचा निकाल लागेल. इंग्लंडला विजयासाठी ३५ धावांची गरज आहे. तर भारताला विजयासाठी ४ विकेट्सची आवश्यकता आहे.
जोरदार पावसाला सुरूवात
खराब सूर्यप्रकाशामुळे सामना थांबल्यानंतर जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आजचा खेळ पुन्हा सुरू होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अचानक थांबवला खेळ
भारत इंग्लंड पाचवा कसोटी सामना निर्णायक वळणावर असताना अचानक खेळ थांबवण्यात आला आहे. लंडनमध्ये आभाळात काळे ढग दाटून आले आहेत आणि त्यामुळे खराब सूर्यप्रकाशामुळे सामना अचानक थांबवला. तर पावसाची चिन्ह असल्याने मैदानात कव्हर्स आणले गेले आहेत. रूटची विकेट गेल्यानंतर भारतीय गोलंदाजांकडून भेदक गोलंदाजी केली जात आहे आणि इंग्लंडचा संघ दबावाखाली फलंदाजी करत आहे. पण सामना मध्येच थांबल्याने गोलंदाजांच्या लयीवर याचा परिणाम होणार आहे.
प्रसिध कृष्णाची भेदक गोलंदाजी
प्रसिध कृष्णाने कमालीच्या चेंडूवर जेकब बेथलला क्लीन बोल्ड केलं. यानंतर त्याने जो रूटला जबरदस्त चेंडू टाकत झेलबाद केलं. प्रसिधने टाकलेला चेंडू रूटच्या बॅटची कड घेत विकेटकिपरच्या दिशेने गेला आणि ध्रुव जुरेलने एक कमालीचा झेल टिपला.
जो रूटचं शतक
जो रूटने १३७ चेंडूत ३९वं कसोटी शतक केलं आहे. रूटने इंग्लंडचा माजी फलंदाज ग्राहम थोर्प याला हे शतक समर्पित केलं.
हॅरी ब्रूक झेलबाद
हॅरी ब्रूक १११ धावांची खेळी करत आकाशदीपच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
हॅरी ब्रूकचं शतक
हॅरी ब्रूकने ९१ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांसह आपलं शतक पूर्ण केलं आहे. या शतकासह भारतीय संघ ओव्हल कसोटीत मागे पडला आहे. इंग्लंडने २८६ धावा केल्या असून त्यांना विजयासाठी फक्त ८८ धावांची गरज आहे.
रूट-ब्रूकची भागीदारी
इंग्लंडचे फलंदाज हॅरी ब्रूक-जो रूट यांनी आतापर्यंत १७० धावांची भागीदारी रचत भारतापासून सामना दूर नेत आहेत. आता इंग्लंडला विजयासाठी फक्त १०० धावांची गरज आहे. इंग्लंडने १०६ धावांवर तिसरी विकेट गमावली होती. तिथून आता २८३ धावांपर्यंत संघाने एकही विकेट गमावलेली नाही.
जो रूटचं अर्धशतक
जो रूटने ८० चेंडूत ६ चौकारांसह अर्धशतक केलं, रूटचं हे ६७वं अर्धशतक आहे. रूट आणि ब्रूकने १२२ धावांची भागीदारी रचत वेगाने धावा करत आहे.
हॅरी ब्रूकचं अर्धशतक
इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकने ३९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केलं आहे. यासह इंग्लंडने ३ बाद १८४ धावा केल्या आहेत.
इंग्लंडने लंचब्रेकपर्यंत किती धावा केल्या?
इंग्लंडने चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात ४ च्या रनरेटने ११४ धावा केल्या आहेत. यासह इंग्लंडने आतापर्यंत ३ बाद १६४ धावा केल्या आहेत आणि विजयासाठी अद्याप त्यांना २१० धावांची गरज आहे. तर भारताला विजयासाठी ७ विकेट्सची गरज आहे. मोहम्मद सिराजने हॅरी ब्रूकचा झेल टिपल्यानंतर सीमारेषेवर त्याचा पाय पडला आणि ब्रूक नाबाद राहिला, याचा भारताला चांगलाच फटका बसला आहे.
ऑली पोप माघारी परतला
मोहम्मद सिराजने २८व्या षटकात भारताला तिसरी विकेट मिळवून दिली आहे. सिराजचा जबरदस्त चेंडू थेट पोपच्या पॅडवर जाऊन आदळला आणि पोप त्रिफळाचीत झाला. पोपने रिव्ह्यू घेतला, पण चेंडू इतका परफेक्ट होता की तो थेट मधल्या स्टम्पवर जाऊन आदळला होता. यासह पोप २७ धावा करत बाद झाला. यासह आता इंग्लंडला विजयासाटी २६८ धावांची गरज आहे, तर भारताला ८ विकेटची गरज आहे.
बेन डकेट अर्धशतकानंतर बाद
इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन डकेट अर्धशतक करताच पुढच्या षटकात बाद झाला. प्रसिध कृष्णाने चौथ्या दिवशी भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. २३ व्या षटकात डकेटच्या बॅटची कड घेत चेंडू स्लिपमध्ये गेला आणि राहुलने एक कमालीचा झेल टिपला. यासह डकेट ६ चौकारांसह ५२ धावा करत बाद झाला.
ओव्हल कसोटी चौथ्या दिवसाचा खेळ सुरू
भारत आणि इंग्लंड पाचव्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारताला विजयासाठी ९ विकेट्सची गरज आहे, तर इंग्लंडला अजून ३२४ धावा करायच्या आहेत. या सामन्याचा आज चौथ्या दिवशी निकाल लागण्याची देखील शक्यता आहे.
ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवशी काय घडलं?
भारतीय संघ तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला फलंदाजीला उतरला होता. यशस्वी जैस्वाल आणि आकाशदीप यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी करताना भारताने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. यशस्वीने शतक तर नाईट वॉचमन आकाशदीपने अर्धशतकी भागीदारी केली. यानंतर भारताच्या सर्व फलंदाजांनी आपलं योगदान दिलं. यानंतर रवींद्र जडेजाने आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला ३५० धावांच्या पार नेलं. भारतीय संघ दुसऱ्या डावात ३९६ धावा करत सर्वबाद झाला, यासह भारताने इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडने तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत १ बाद ५० धावा केल्या आहेत. सिराजने दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर क्रॉलीला बाद करत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यासह भारताकडे अजूनही ३२४ धावांची आघाडी आहे.