Yashasvi and Kuldeep praised by Rohit Sharma : इंग्लंडविरुद्धची ५ सामन्यांची कसोटी मालिका ४-१ ने जिंकण्यात भारताला यश आले. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड संघाला पुनरागमनाची एकही संधी न देता पुढील ४ सामन्यांमध्ये शानदार विजय नोंदवले. या मालिकेत भारताच्या गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागाने जबरदस्त कामगिरी केली. मालिका समाप्तीनंतर कर्णधार रोहित शर्माने यशस्वी जैस्वालसह संघातील सर्वांचे कौतुक केले.

“या मालिका विजयाचे श्रेय संपूर्ण संघाला जाते” – रोहित शर्मा

कसोटी मालिका संपल्यानंतर सादरीकरणादरम्यान रोहित शर्मा म्हणाला की, “जेव्हा तुम्ही अशाप्रकारे कसोटी मालिका जिंकता, तेव्हा सर्वकाही योग्य ठिकाणी असल्याचे दिसते. संघातील काही खेळाडूंना या फॉरमॅटमध्ये खेळण्याचा फारसा अनुभव नसेल, पण त्यांनी आतापर्यंत भरपूर क्रिकेट खेळले आहे आणि दबावाखाली ते अधिक चांगली कामगिरी करू शकतील याची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती, ती त्यांनी पार पाडली. या मालिकेतील विजयाचे श्रेय संपूर्ण संघाला जाते. जेव्हा तुम्ही अशी मालिका जिंकता, तेव्हा प्रत्येकजण शतकांबद्दल बोलतो पण कसोटी सामना जिंकण्यासाठी तुम्हाला २० विकेट्स मिळवाव्या लागतात.”

कुलदीप आणि यशस्वीबद्दल रोहित काय म्हणाला?

इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत कुलदीप यादव आणि यशस्वी जैस्वाल यांची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. कर्णधार रोहित शर्माने आपल्या वक्तव्यात दोन्ही खेळाडूंचे कौतुक करताना म्हणाला की, “आम्ही कुलदीपशी खूप आधी बोललो होतो, या शेवटच्या सामन्याच्या पहिल्या डावात आम्ही विकेट शोधत होतो, तेव्हा कुलदीपने आम्हाला यश मिळवून दिले होते. दुखापतीतून पुनरागमन केल्यापासून, कुलदीपने खूप चांगला खेळ दाखवला आहे आणि एनसीएमध्ये त्याच्या तंदुरुस्तीबाबतही भरपूर काम केले आहे.”

हेही वाचा – IND vs ENG : पाचव्या कसोटीत भारताचा मोठा विजय, इंग्लंडच्या बॅझबॉलला धूळ चारत मालिका ४-१ ने घातली खिशात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यशस्वी जैस्वालबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “यशस्वीचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. जेव्हा अशा प्रकारचे खेळाडू आपल्या संघात असतात, तेव्हा विरोधी संघाच्या गोलंदाजांवर दबाव जाणवतो. त्याला अजूनही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असले, तरी या सर्व परिस्थितीसाठी तो स्वत:ला तयार ठेवतो.”