Jasprit Bumrah Equals Kapil Dev Record: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहच्या धारदार गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. ज्या खेळपट्टीवर फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. त्याच खेळपट्टीवर जसप्रीत बुमराहने ५ गडी बाद करत इतिहास रचला आहे. त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये कपिल देव यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. भारताबाहेर कसोटी क्रिकेट खेळताना त्याने सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कपिल देव यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. बुमराह आणि कपिल देव यांनी भारताबाहेर गोलंदाजी करताना १२ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

जसप्रीत बुमराह हा भारतीय कसोटी संघातील प्रमुख गोलंदाज आहे. लीड्सच्या खेळपट्टीवर मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर विकेट्स घेण्यासाठी संघर्ष करताना दिसून आले. त्याच खेळपट्टीवर बुमराहने इंग्लंडच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक मोठे धक्के दिले. यादरम्यान बुमराहच्या गोलंदाजीवर काही झेल सुटले. नाहीतर इंग्लंडचा संघ आणखी लवकर ऑलआऊट होऊ शकला असता. बुमराहने या डावात गोलंदाजी करताना २४.४ षटकं गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ८३ धावा खर्च करत ५ गडी बाद केले.

जसप्रीत बुमराहची कपिल देव यांच्या रेकॉर्डशी बरोबरी

भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणाचं नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहने या डावात गोलंदाजी करताना जॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, ख्रिस वोक्स आणि जोश टंग यांना माघारी धाडत ५ विकेट्स पूर्ण केल्या. जोश टंगला बाद करताच बुमराहने भारताबाहेर खेळताना सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कपिल देव यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १४ वेळेस एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. कपिल देव यांनी ६६ डावात हा कारनामा केला होता. तर जसप्रीत बुमराहने हा कारनामा ३४ व्या कसोटी सामन्यात करून दाखवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लडचा पहिला डाव ४६५ धावांवर आटोपला आहे. इंग्लंडकडून फलंदाजी करताना बेन डकेटने ६२ धावांची खेळी केली. तर ओली पोपने १०६ धावा चोपल्या. जो रूटने २८ आणि हॅरी ब्रुकने ९९ धावांची खेळी केली. जेमी स्मिथने ४० आणि ख्रिस वोक्सने ३८ धावांची खेळी केली. इंग्लंडचा संघ ४७१ धावांपासून अवघ्या ६ धावा दूर राहिला.