भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची करोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे शुक्रवारपासून मँचेस्टरमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यापुढे अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. मात्र संघातील सर्व खेळाडूंच्या करोना (आरटी-पीसीआर) चाचण्यांचे अहवाल नकारात्मक मिळाल्यामुळे सामना होण्याची शक्यता बळावली आहे. मात्र आता करोना संसर्गाच्या सावटाखाली असणाऱ्या भारतीय संघालाच हा सामना खेळण्यामध्ये फारसा रस नसल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे मालिकेमध्ये २-१ ने आघाडी मिळवल्याने भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला म्हणजेच बीसीसीआयला सध्याच्या या इंग्लडविरोधातील मालिकेपेक्षा आगामी इंडियन प्रिमियर लिगची अधिक चिंता वाटत असल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच सुरु होणाऱ्या आयपीएलच्या आधीच भारतीय संघात खेळणाऱ्या खेळाडूंना करोनाची लागण झाली तर पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये अडचणी येतील अशी भीती व्यक्त केली जातेय.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाकडून (ईसीबी) या सामन्यासाठी हिरवा कंदील देण्यात आला आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये सर्व भारतीय खेळाडू करोना निगेटीव्ह असल्याचं स्पष्ट झालं असलं तरी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ या कसोटीबद्दल साशंक आहे. गुरुवारी भारतीय संघातील खेळाडूंची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये संघातील अनेक खेळाडूंनी पाचवा कसोटी सामना न खेळण्याच्या बाजूने मत नोंदवलं. द इंडियन एक्सप्रेसला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून इंडियन प्रिमियर लिगचं उर्वरित पर्व खेळवलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर खेळाडू संसर्गाच्या भीतीने खेळण्याबद्दल फारसे उत्साही नसल्याचं म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Ind vs Eng Manchester Test: …तर एकही संघ मैदानात न उतरताच इंग्लंड विजयी होणार; मालिका २-२ च्या बरोबरीत सुटणार
संसर्ग झाल्यास आयपीएलमध्ये अडचणी…
भविष्यामध्ये काय होणार आहे यासंदर्भात खेळाडूंच्या मनात भीती आहे. करोना संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणं दिसण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो ही सुद्धा चिंता खेळाडूंच्या मनात असल्याचं चर्चेदरम्यान दिसून आलं. भविष्यामध्ये एखाद्या खेळाडूच्या माध्यमातून संसर्ग झाल्यास आयपीएलमधील सहभाग आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषकामध्ये खेळण्यासंदर्भात अडचणी निर्माण होतील असं खेळाडूंना वाटत आहे.
बीसीसीआयलाही सामना नकोच?
खेळाडूंशी चर्चा केल्यानंतर बीसीसीआय सुद्धा हा सामना खेळवण्यासाठी उत्सुक नसल्याचं दिसत आहे. १९ सप्टेंबरपासून करोनाचा फटका बसलेल्या आयपीएलचं उर्वरित पर्व सुरु होत असतानाच या स्पर्धेत पुन्हा अडथळा यावा असं बीसीसीआयला वाटत नसल्याचं सांगण्यात येत आहे. ‘‘पाचव्या कसोटीबाबत सध्या तरी काहीच सांगता येणार नाही. सामना व्हावा, अशी आशा फक्त करता येईल,’’ असे गांगुली यांनी सांगितले. कोलकाता येथे ‘मिशन डॉमिनेशन’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावलेली तेव्हा ते बोलत होते.
आधीच बसलाय करोनाचा फटका…
मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांच्यानंतर परमार यांना करोनाची लागण झाल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला गुरुवारचे सराव सत्र रद्द करावे लागले. संघामधील सर्व खेळाडूंच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या. सावधगिरी म्हणून भारतीय चमूला आपापल्या खोलीत थांबण्याचे निर्देश देण्यात आले होते. शास्त्री यांच्या संपर्कातील भारताचे मुख्य फिजिओ नितीन पटेल सध्या विलगीकरणात असल्यामुळे पाचव्या कसोटीस संघासोबत फिजिओ नसेल. क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर. श्रीधरसुद्धा विलगीकरणात असून, फक्त फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड संघासोबत आहेत. सर्व खेळाडू आणि मार्गदर्शकांचे लसीकरण पूर्ण झाले असले तरी इंग्लंडमध्ये जनजीवन पूर्वपदावर आल्यामुळे दोन्ही संघांमधील खेळाडू सध्या जैव-सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करीत नाहीत. लंडनमध्ये पुस्तक प्रकाशनाच्या सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शास्त्री यांना करोनाची लक्षणे आढळून आली आहेत. या कार्यक्रमाला अरुण, पटेल आणि श्रीधर यांनीही हजेरी लावली होती.