Who Will Replace Rishabh Pant in IND vs ENG 5th Test: ऋषभ पंतला मँचेस्टर कसोटीत पायाला दुखापत झाली आहे. ऋषभ पंतला दुखापतीनंतर त्याच्या पायाच्या बोटाला फ्रँक्चर झालं आहे, पण तरीही चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात फलंदाजीला उतरला आहे. ऋषभ पंतला नीट चालताही येत नसताना तो फलंदाजी करत आहे, पण पाचव्या कसोटीत मात्र त्याच्या खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे त्याच्या जागी नव्या यष्टीरक्षक फलंदाजासाठी पाचारण केलं आहे.
इंग्लंडविरूद्ध पाचव्या कसोटी सामन्यासाठी, ऋषभ पंतऐवजी, इशान किशनला भारतीय संघात संधी मिळू शकते असे म्हटले जात होते. परंतु इशान किशन नव्हे तर तामिळनाडूच्या २९ वर्षीय विकेटकीपर-फलंदाजाला संधी दिली जाणार आहे. या उजव्या हाताच्या विकेटकीपर-फलंदाजाचा भारतीय संघात समावेश होणं जवळजवळ निश्चित आहे आणि क्रिकबझनुसार, लवकरच त्याची अधिकृत घोषणा देखील केली जाऊ शकते.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला दुखापत झाली. या सामन्यात दुखापत असूनही पंत फलंदाजीसाठी आला असला तरी, इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत खेळणं त्याच्यासाठी कठीण आहे. आता ५ व्या कसोटी सामन्यासाठी पंतच्या जागी तामिळनाडूचा यष्टीरक्षक-फलंदाज एन जगदीसनला भारतीय संघात स्थान मिळू शकते.
ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत अपडेट समोर येताच इशान किशनला संधी दिली जाऊ शकते, अशी माहिती समोर आली होती. इशान किशन सध्या इंग्लंडमध्ये असून तो काऊंटी क्रिकेट खेळत आहे. पण इशानने त्याच्या घोट्याला दुखापत झाल्याची माहिती निवडकर्त्यांनी दिली आहे. वेळेत पूर्णपणे तंदुरूस्त होऊ शकणार नसल्याचे त्याने कळवले आहे. केएस भरतने इंग्लंडविरूद्ध घरच्या मैदानावर चांगली कामगिरी न केल्याने त्याचा विचार केला जात नाहीये.
एन जगदीशनने आतापर्यंत भारतासाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही आणि त्याला पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात येणार आहे. तामिळनाडूचा यष्टीरक्षक-फलंदाज नारायण जगदीशनची प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्द उत्तम राहिली आहे, त्याने ५२ सामन्यांच्या ७९ डावात ४७.५० च्या सरासरीने ३३७३ धावा केल्या आहेत.
जगदीशनने या सामन्यांमध्ये १० शतकं आणि १४ अर्धशतकं झळकावली आहेत आणि यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या ३२१ धावा आहे. यष्टिरक्षक म्हणून त्याने आतापर्यंत खेळलेल्या ५२ सामन्यांमध्ये १३३ झेल घेतले आहेत आणि १४ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.