भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंग्ले येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस पाहुण्या संघाच्या गोलंदाजांसाठी दमछाक करणारा होता. इंग्लंडने त्यांचा कर्णधार जो रूटच्या शतकामुळे दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद ४२३ धावा केल्या आणि त्यांच्याकडे आता ३४५ धावांची आघाडी आहे. रूटने १६५ चेंडूत १४ चौकारांसह १२१ धावांची खेळी केली आणि मालिकेतील तिसरे शतक झळकावले. यादरम्यान, भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतशी संबंधित एक घटना घडली.
दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान पंत आणि कर्णधार विराट कोहली मैदानावरील पंचांशी संवाद साधताना दिसले. तिसरे सत्र सुरू होण्याआधी, मॅच अधिकारी अॅलेक्स व्हार्फ आणि रिचर्ड केटलबरो यांनी पंतला त्याच्या यष्टीरक्षण ग्लोव्ह्जवरील टेप काढण्यास सांगितले. त्याच्या चौथ्या आणि पाचव्या बोटाच्या दरम्यान ही टेप स्पष्टपणे दिसत होती जी एमसीसी नियमानुसार योग्य नाही.
हेही वाचा – “प्रत्येक विकेट गेल्यानंतर आरडाओरड न करताही…”; संतापलेल्या गावसकरांचा विराटला टोला
ग्लोव्ह्जसंबंधीत नियम २७.२ असे सांगतो, की नियमानुसार परवानगी मिळाल्याप्रमाणे, यष्टीरक्षकाने ग्लोव्ह्जघातले तर, त्याने तर्जनी आणि अंगठा वगळता बोटांमध्ये कोणतेही बंधन असू नये. विशेष म्हणजे, टी-ब्रेकच्या आधी शेवटच्या चेंडूवर डेव्हिड मलानचा झेल घेतल्याल्यानंतर पंचांनी पंतच्या ग्लोव्ह्जमधून टेप काढून टाकल्या. त्याच वेळी, समालोचक नासिर हुसेन आणि डेव्हिड लॉयड यांनी हा गोंधळ स्पष्ट केला.
ऋषभ पंत भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजीत मोठी भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. या कसोटी सामन्यात भारत पिछाडीवर आहे. २३ वर्षीय पंत आपल्या कारकिर्दीतील २४वा कसोटी सामना खेळत आहे. त्याने आतापर्यंत ३ शतके आणि ६ अर्धशतके केली आहेत आणि त्याच्या नावावर १४८७ धावा आहेत.
